शहरात वाहतूक पोलीसांचा बेकायदेशीर प्रवास

0

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरात वाहतुकीचे नियम कठोर असले तरी वाहतूक पोलिसांकडून नियमांची पायमल्ली होत आहे. वाहतूक पोलीस रिक्षामध्ये चालकासोबत बसून प्रवास करताना आढळून येत असल्याने पोलिसांनीच पोलिसांचे नियम धाब्यावर बसविले आहे. सोमवारी सायंकाळी पिंपरी ते चिंचवड या मार्गावर एका वाहतूक पोलिसाने रिक्षामध्ये प्रवासी बसलेले असताना चक्क चालकाशेजारी बसून प्रवास केला. शहरात वाहतुकीच्या नियमांचे पालन अत्यंत काटेकोरपणे केले जात आहे. अगदी सिग्नल पासून ते वाहनांच्या नंबर प्लेट पर्यंत जर काही चूक असेल तर लगेच संबंधित वाहन चालकावर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे वाहतूक शाखेकडे मोठ्या प्रमाणात दंड वसूल जमा होत आहे. तर दुसरीकडे शहराला वाहतुकीची शिस्त लागत आहे.

पोलिसांसाठी नियम नाहीत…
बंद असलेले सिग्नल सुरु झाले आहेत. अतिक्रमण हटवून वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित केली जात आहे. प्रत्येक वाहनांची आसनक्षमता ठरलेली आहे. त्या क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असतील तरी त्या वाहनांवर कारवाई केली जात आहे. मात्र वाहतूक पोलीस जेव्हा रिक्षातून बेकायदेशीरपणे प्रवास करतात, तेव्हा मात्र हे सर्व नियम त्यांच्यासाठी नाहीत का? असा प्रश्‍न उपस्थित होतो.