चिंचवड : कोहिनूर ग्रुप, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगर चेस असोिएशन यांच्या वतीने व पुणे जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने 13 व्या श्रीमती सी. के. गोयल स्मृतिचषक शालेय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन 13 व 14 जानेवारीला केलेआहे. निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या मनोहर वाढोकर स्मृती सभागृहात स्पर्धा होईल. यासाठी 7, 9, 11, 13 व 15 वर्षाखालील असे 5 गट असून स्वीसलिग पद्धतीच्या 8 फेर्यात ती होणार आहे.
वीस हजारांची रोख बक्षीसे
यशस्वी खेळाडूंना एकूण 20 हजारांची रोख बक्षिसे (प्रत्येक गटासाठी 4000 रुपये) प्रदान करण्यात येणार आहेत. प्रत्येक गटातील प्रथम दोन क्रमांकांना सन्मानचिन्हे व 3 ते 15 क्रमांक प्राप्त खेळाडूंना (एकूण 65) पदके प्रदान करण्यात येतील. याशिवाय दरवर्षीप्रमाणे प्रत्येक गटातील पहिल्या पाच क्रमांकप्राप्त खेळाडूंच्या गुणांनुसार विजयी ठरलेल्या शाळेला सांघिक अजिंक्यपदचा ‘सी. के. गोयल स्मृतीचषक’ देऊन सन्मानित करण्यात येईल. मागील वर्षी ‘डी.ए.व्ही. पब्लिक, औंध’ ही शाळा अजिंक्यपदाची मानकरी ठरली होती.
111 शाळा सहभागी
काटेकार आणि दर्जेदार आयोजन असल्याने स्थानिक पातळीत सुरू केलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध भागातून युवा खेळाडू सहभागी होण्याची प्रमाण वाढले आहे. या स्पर्धेत पुणे, पिंपरी-चिंचवड, पुणे जिल्ह्या व्यतिरिक्त कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, पनवेल, रायगड या जिल्ह्यातील 111 शाळांमधील 290 खेळाडूंनी आपला सहभाग निश्चित केला आहे.