धुळे । ‘हर हर महादेव’, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’, ‘जयतु जयतु हिन्दु राष्ट्रम्’ या आणि अन्य गगन भेदून टाकणार्या घोषणा अन् भगव्या ध्वजांमुळे भगवी झाली होती. तसेच 25 डिसेंबरला होणार्या हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त शहरात शनिवारी 23 डिसेंबर रोजी काढलेल्या वाहनफेरीने धुळे नगरीचे वातावरण दुमदुमून गेले. या वाहनफेरीमध्ये शेकडो दुचाकी वाहने तसेच तीनचाकी, चारचाकी वाहने सहभागी झाली होती. यानंतर धर्मध्वज पुजनाचे पौराहित्य समितीचे श्रेयस पिसोळकर यांनी, तर पूजन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते आणि हभप वासुदेव महाराज आर्वीकर हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. धुळ्यात होणारी सभा महत्वाची असून हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून हि सभा यशस्वी करा, असे आवाहन डॉ भामरे यांनी या वेळी केले.
यांची होती उपस्थिती
नाशिककर ज्वेलर्सचे अभय नाशिककर, तसेच अविनाश चौधरी, मनोज जैन, किशोर शर्मा, शशिकला बागुल यांनी विविध चौकांमध्ये फेरीचे स्वागत आणि धर्मध्वजाचे पूजन केले. ह.भ.प. वासुदेव महाराज आर्वीकर, शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश मिस्त्री, प्रवीण अगरवाल, योगेश गोसावी, भाजपचे चेतन मंडोरे, प्रदीप जाधव, सिद्धार्थ करनकाळ, सुनील चौधरी, कपिल शर्मा, राजू महाराज यांच्यासह राज्य संघटक सुनील घनवट, सदगुरु नंदकुमार जाधव हेदेखील उपस्थित होते.
फेरीमध्ये हिंदुत्ववादी संघटना
शिवसेना, शिवसेना महिला आघाडी, भाजपा, भाजयुमो, वारकरी संप्रदाय, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदू एकता आंदोलन पक्ष, माजी महापौर जयश्री अहिरराव, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या ज्योत्स्ना मुंदडा यांच्यासह हिंदू जनजागृती समिती, सनातन संस्थेचे धुळे शहर व ग्रामीण भागातील शेकडो धर्मप्रेमी हिंदू उपस्थित होते.
पारंपारिक पोशाखात सहभाग
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, पारोळा रोड येथून प्रारंभ झालेली वाहनफेरी शहरातील विविध प्रमुख चौकातून काढण्यात आली. यावाहन फेरीचा समारोप अग्रसेन चौकात अग्रसेन पुतळ्याजवळ करण्यात आला. वाहनफेरीमध्ये भगवे ध्वज, भगवे फेटे आणि पारंपारिक पोशाखात नागरिक सहभागी झाले होते. तसेच फेरीमध्ये युवक, लहान मुले आणि वयस्क यांचा सहभाग लक्षणीय होता. फेरीच्या मार्गावर ठिकठिकाणी धर्मध्वजाचे पूजन आणि पुष्पवृष्टी तसेच माल्यार्पण करण्यात आले.