शहरात स्वच्छता कमी, खर्च जास्त;मक्ते रद्द करण्याची चर्चा

0

जळगाव । पावसामुळे जळगाव शहरातील सर्वच भागात कचरा वाहून आला आहे. अनेक ठिकाणी कचर्‍याचे ढीग शहराला अवकळा आली आहे. शहरातील 22 प्रभागात सफाईचे मक्ते देवून देखिल स्वच्छता कमी व खर्चच जास्त अशी परिस्थिती निर्माण झाल्याने मक्ते रद्द करण्याबाबत चर्चा सरु असल्याचे समजते. मेहरुण रामेश्वर कॉलनी, शाहू नगर, गोपाळपुरा, बजरंग बोगदा परिसरांध्ये नाल्याचे पाणी रस्त्यावर आले. अनेक घरांमध्ये पाणी घुसून ससांरपयोगी वस्तुंचे नुकसान झाले. पहिल्याच मुसळधार पावासाने महापालिकेच्या नाले सफाईचा बोजवारा उडविला.

गाळ, कचरा आला रस्त्यावर
जळगाव शहरात सफाईचा प्रश्न कायम आहे. शहरात कुठेही पूर्णपणे स्वच्छता होत नाही. त्यातच पावसाळा सुरु झाल्याने कचरा ओला झाल्याने शहराला अवकळा आली आहे. यामुळे जळगावकरांच्या आरोग्या प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील मेहरुण, तांबापूर, शनिपेठ, जुने जळगाव, हरिविठ्ठल नगर यासह सर्वच उपनगरांमध्ये व मध्यवर्ती शहरात देखिल साचलेल्या कचर्‍याचा प्रश्न आहे. शहरांमधील नाल्यांमधून देखिल कचरा वाहून आला आहे. तसेच नाले सफाई करतांना गाळ तसाच नाल्यांच्या काठावर ठेवल्याने तो देखिल रस्त्यांवर आला आहे.

मक्त्यांबाबत पुनर्विचार करण्याची तयारी
जळगाव शहरातील 22 प्रभागांमध्ये सफाईचे मक्ते देवून देखिल काहीच फायदा झालेला नाही. दरमहा फक्त 22 प्रभागातील मक्त्यांसाठी 70 लाख रुपये खर्च करुन देखिल प्रभावीपणे सफाई केली जात नसल्याने त्याबद्दल देखिल संशय निर्माण झाला आहे. यापूर्वी मक्तेदाराकडून मजूर घेवून त्यांच्या व मनपाच्या कायम कर्मचार्‍यांकडून सफाईचे काम केले जात होते. त्याचा खर्च देखिल कमी असतांना मक्ते दिल्याने महापालिकेच्या खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे आता पुन्हा हे मक्त्यांबाबत पुर्नविचार करण्याची तयारी महापालिकेत सुरु असल्याचे समजते.