छापील किमतीपेक्षा पाच रुपये जादा
पिंपरी : ग्राहकांना कोणतीही वस्तू त्या वस्तूवरील छापील किमतीत मिळावी, यासाठी राज्यात दर नियंत्रण कायदा अंमलात आणला आहे. मात्र, याबाबतची पडताळणी करण्यासाठी सक्षम व पुरेशी यंत्रणा शासनाकडे नसल्यामुळे या कायद्याचे पिंपरी-चिंचवड शहरात तीन तेरा वाजले आहेत. शीतपेय व पाण्याच्या बाटल्याचा दर छापील किमतीपेक्षा पाच रुपये जादा दर आकारला जात आहे. प्रशासनातील काही अधिकार्यांचे उद्योजक व व्यापार्याबरोबरच लागेबांधे आहेत. यामुळे मूल्य नियंत्रण कायद्याच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. ग्राहकांना नाइलाजास्तव छापील किमतीपेक्षा अधिकची रक्कम मोजावी लागत आहे. शीतपेय व पाण्याच्या बाटल्याचा दर छापील किमतीपेक्षा पाच रुपये जादा दर आकारला जात आहे.
शहरातील दापोडी, पिंपरी, चिंचवड ,आकुर्डी, देहूरोड, लोणावळा या भागातील रेल्वे स्टेशनवर शीतपेय विक्रेत्यांनी ग्राहकाची मोठ्या प्रमाणात लूट चालवली असून बाटली मागे सुमारे पाच रुपये जादा आकारणी करण्यात येत आहे. या प्रकाराकडे वैद्यमापन अधिकार्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे. एखाद्या वस्तूची छापील किमतीपेक्षा जादा दराने विक्री करणे हे कायद्यानुसार गुन्हा आहे. या प्रकरणात शिक्षा व दंडाचीही तरतूद आहे. सध्या उन्हाळा असल्याने शीतपेय व थंड पाण्याच्या बाटलीला अधिक मागणी आहे. मात्र, छापील किमतीपेक्षा पाच रुपये जादा दराने बाजारपेठेत विक्री करण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.