शहरामध्ये विविध उपक्रमांनी गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी

0

पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहरात विविध सामाजिक संस्था, शाळांमधून गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी जीवनातील गुरुचे महत्व काय असते ते सांगण्यात आले. यावेळी विविध उपकेम राबविण्यात आले. गुरुपौर्णिमा ही ‘व्यासपौर्णिमा’ म्हणून ओळखली जाते. व्ही.एच.बी.पी. पांडुरंग काटे प्रतिष्ठान संचालित पी.के. इंटरनॅशनल इंग्लिश स्कुलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शाळेचे संस्थापक जगन्नाथ काटे यांच्या हस्ते दत्तगुरूंच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.

विद्यार्थांनी आपल्या भाषणातून गुरूंबद्दलचे प्रेम व्यक्त केले. तर शाळेच्या मुख्याध्यापिका दीपाली जुगुळकर यांनी विद्यार्थ्यांना जीवनात गुरुचे असलेले महत्व पटवून सांगितले. शाळेतील सर्व शिक्षकांना श्रीफळ, गुलाबपुष्प देऊन वंदन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक संगीता पराळे, विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन भक्ती लोवेकर, माधुरी निकम यांनी केले .

नंदकिशोर कल्चरल सोसायटी
नृत्यसंस्था नंदकिशोर कल्चरल सोसायटीच्यावतीने गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. नंदकिशोर कपोते यांनी आपले गुरु पं. बिरजू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. संस्थेच्या 100 विद्यार्थ्यांनी नृत्ये सादर केली. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्ये म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतःच्या नृत्यातून रचना सादर केल्या. डॉ. कपोते यांनी कथक नृत्य सादर करुन नेत्रदिपक अभिनयाने रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. यावेळी नगरसेवक सचिन चिखले, नगरसेविका सुमन पवळे, पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते, कलाकार निकिता सिंह, नगरसेवक उत्तम केंदळे, नगरसेविका कमल घोलप, नगरसेविका सुलभा उबाळे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, उद्योगपती सागर मारणे आदी उपस्थित होते.

किड्स पॅराडाईज स्कूल
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधुन चर्‍होली बुद्रुक येथील किड्स पॅराडाईज स्कूल मधील विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले. या शाळेतील विद्यार्थ्यांनी गुरुदक्षिणा म्हणून आणि पर्यावरण वाचवण्यासाठी शाळेच्या आवारात झाडे लावली. यावेळी प्रज्ञा काळे, स्वाती काळे व मुख्याध्यापक विद्युत सहारे संदेश व शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी एकूण 120 झाडे लावण्यात आली.

अरविंद एज्युकेशन सोसायटी
गुरुपौर्णिमेनिमित्त जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या भारतीय विद्यानिकेतन विद्यालयामध्ये ‘माता-पिता पाद्यपूजन’ या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना आपल्या आई-वडीलांविषयी कृतज्ञता व्यक्त करता यावी, या उद्देशाने या विद्यार्थ्यांनी आपल्या आईवडिलांचे पाद्यपूजन केले. या कार्यक्रमात दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे माता-पिता सहभागी झाले होते. आपल्याच पाल्याने केलेल्या पाद्यपूजनाने पालकांचे मन भारावून गेले, तसेच विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञेने पालकांचे डोळे पाणावले. यावेळी विद्यार्थ्यांनी गाणी सादर करीत सर्वांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमासाठी सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका गीता येरुणकर, तेजल कोळसे-पाटील, भटू शिंदे आदी उपस्थित होते. प्रशालेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी यांनी कार्यक्रमासाठी परीश्रम घेतले.