शहरासाठी स्वतंत्र कामगार कार्यालय करा !

0

भाजप निगडी अध्यक्ष हातागळे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहर कामगार व औद्योगिकनगरी असल्याने शहरातील कामगारांच्या हितासाठी पिंपरी चिंचवड शहरात स्वतंत्र हायटेक व सुसज्ज कामगार कार्यालय उभारण्यात यावे अशी मागणी भाजप निगडी अध्यक्ष तथा बांधकाम कामगार सेनेचे उपाध्यक्ष किशोर हातागळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

चिंचवड कार्यालयाला कळा
निवेदनात म्हटले आहे, पुणे जिल्हा कामगार उपआयुक्तांच्या अखत्यारीत असणार्‍या चिंचवड कार्यालयाला अक्षरशः दारीद्रयाची कळा आली असुन सन 1985 सालापासुन कार्यरत असणार्‍या या शासकीय कार्यालयाची अतिशय भयानक अवस्था झालेली आहे.

या कार्यालयातील कार्यक्षेत्रात पिंपरी चिंचवड, चाकण, मुळशी, खेड, आंबेगाव इत्यादी भागाचा समावेश होतो सुमारे दिड लाख दुकाने या कार्यालयांतर्गत येतात, त्यामुळे एवढ्या मोठ्या कार्यक्षेत्राचे कार्यालय एवढे जुनाट व भयानक अवस्थेत आहे, या कार्यालयाचा परिसरही अस्वच्छ असुन कचर्‍याच्या ढीगातुन वाट काढत कार्यालयात जावे लागते आणि तेथे गेल्यावरही अशीच भयानक परिस्थिती बघावी लागते.

कार्यालयाला हायटेक करा
देशातील व राज्यातील सर्वच शासकीय कार्यालये हायटेक होत असताना चिंचवड येथील कार्यालय अपवाद ठरत आहे त्यामुळे याही कार्यालयाला हायटेक करण्यासाठी या ठिकाणच्या कार्यालयाचे स्थलांतर करून प्रशस्त इमारतीमध्ये नव्याने नुतनीकरण करण्यात यावे. पिंपरी चिंचवड शहर ही औद्योगिक नगरी असल्याने मोठ्या प्रमाणावर कामगार येथे वास्तव्यास आहेत तसेच बांधकाम कामगार, घरेलू कामगार, माथाडी कामगार, व इतर असंघटित कामगार येथे मोठ्या प्रमाणात असुन त्यांना शिवाजीनगर येथील पुणे जिल्हा कामगार उपआयुक्त कार्यालयात जाऊन शासकीय योजनेचा लाभ घेण्यास खुप अडचणीचा सामना करावा लागतो.