पिंपरी चिंचवड : महापालिकेच्या विविध प्रकल्पासाठी आरक्षित मोकळ्या भुखंडांवर अतिक्रमणे होत असल्याने त्याला सिमाभिंती बांधण्याच्या सूचना महापौर राहूल जाधव यांनी दिल्या होत्या. परंतु, त्यावर कोणतीही कार्यवाही न केल्याने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी संबधितांची खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले आहेत. महापौरांनी प्रामुख्याने शहर अभियंता अंबादास चव्हाण यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाईची मागणी केल्याने त्यांची खातेनिहाय चौकशी होणार आहे.
पिंपरी महापालिकेच्या वतीने विविध विकास कामांसाठी शहरात जागा आरक्षित करण्यात आल्या. त्यापैकी काही जागा महापालिकेच्या ताब्यात आल्या आहेत. त्यांचे भूसंपादन झाले आहे. तर, काही जागा अजूनही ताब्यात आलेल्या नाहीत. ताब्यात आलेल्या जागांवर नागरिकांनी अतिक्रमणे केली आहेत. अनधिकृतपणे या जागांचा वापर सुरू आहे. त्यातून आर्थिक नुकसान होत आहे. त्यासाठी सर्व आरक्षित जागांची, भुसंपादन झालेल्या आणि न झालेल्या भुखंडाची माहिती देण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या. तसेच या जागांना सिमाभिंत बांधून तेथे फलक लावण्याचे आदेशही दिले होते.
हे देखील वाचा
एका महिन्याऐवजी दोन महिने मुदत देऊनही स्थापत्य विभाग व विभागाचे प्रमुख शहर अभियंता चव्हाण यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे संताप व्यक्त करत कार्यवाही न केलेल्या अधिकार्यांवर निलंबनाची कारवाईची मागणी आयुक्तांकडे लेखी पत्राव्दारे केली. त्या पत्राला आयुक्तांनी उत्तर दिले आहे. महापौरांनी मागितलेली माहिती न दिल्याने संबधितांची खातेनिहाय चौकशी सुरू करण्याचे आदेश दिले असल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे.
दरम्यान, महापौरांच्या तक्रारीनुसार आयुक्त हर्डीकर यांनी संबधित अधिका-यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले. परंतु, त्याबरोबर महापौर जाधव यांच्या मागणीनुसार त्यांना हवी असलेली माहिती दोन दिवसात उपलब्ध करून देण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत. माहिती देण्यास दिरंगाई किंवा टाळाटाळ केल्यास संबधितांवर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.