शहर परिवर्तन अधिकार्‍यांची मुळशीत आज, उद्या कार्यशाळा

0

सव्वा दोन लाखाचा खर्च पडणार

पिंपरी-चिंचवड : महापालिकेने शहर परिवर्तन कार्यालयाची सुरुवात केली आहे. धोरणासंदर्भात चर्चा करण्यासाठी तसेच नियोजनासाठी, शहर परिवर्तनासाठी सर्व अधिकार्‍यांची येत्या शुक्रवारी आणि शनिवारी मुळशीतील गरुडमाची येथे कार्यशाळा होणार आहे. त्यासाठी आयुक्तांसह सर्व विभागप्रमुख आणि पॅलॅडियम ग्रुपचे सदस्य असे 50 जण सहभागी होणार आहेत. त्यासाठी सव्वा दोन लाख रुपये खर्च येणार आहे.

धोरण व नियोजनावर चर्चा
माहिती व तंत्रज्ञान विभागातर्फे जेएनएनयुआरएम, स्मार्ट सिटी, पंतप्रधान आवास योजना तसेच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सेल सिटी ट्रान्सफॉर्मेशन ऑफिस अमृत योजना आदी विविध योजनांचे कामकाज होत आहे. स्मार्ट सिटी अभियानासाठी गतिमानता आणणे आणि शहर परिवर्तन कामकाजासाठी सिटी ट्रान्सफॉर्मेशन ऑफिस सुरू केले आहे. धोरण आखण्यासाठी महापालिकेतील सर्व अधिकार्‍यांची मुळशीतील गरूड माची येथे 29 आणि 30 जून रोजी कार्यशाळा होणार आहे.

खर्च रोख स्वरुपात करणार
कार्यशाळेला जाण्या-येण्यासाठी 50 आसनांची बस व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रवासी वाहतूक खर्च 20 हजार रुपये होणार आहे. कार्यशाळेत कॉन्फरन्स हॉल, प्रोजेक्टर, साऊंड सिस्टीम, मायक्रोफोन्स, स्लाईड चेंजर, व्हाईट बोर्ड, पाणी व्यवस्था, 50 जणांचे चहापान, दुपारचे व रात्रीचे जेवण, राहण्याची व्यवस्था, यासाठी अंदाजे एक लाख 90 हजार रुपये तसेच इतर खर्च 15 हजार रुपये असा एकूण सव्वा दोन लाख रुपये खर्च होणार आहे. हा खर्च रोख स्वरूपात करायचा असल्याने थेट पद्धतीने केला जाणार आहे.