भुसावळातील रींग रोडच्या उद्घाटन कार्यक्रमात आमदार संजय सावकारे यांची फटकेबाजी ; तत्कालीन सत्ताधार्यांवर शेलक्या शब्दात टीका
भुसावळ- भुसावळ शहराच्या चौफेर विकासासाठी प्रसंगी मालमत्ता विकाव्या लागल्या तरी हरकत नाही, असे कधी काळी सांगणार्यांनी स्वतःच्या मालमत्ता तर विकल्या नाहीत मात्र नव्याने त्या खरेदी केल्या व अनेक मालमत्ता तर शासन जमाही झाल्यात, अशी टिका आमदार संजय सावकारे यांनी भुसावळातील रींग रोडच्या उद्घाटन कार्यक्रमात केली. तत्कालीन सत्ताधार्यांवर शेलक्या शब्दात त्यांनी टिका करीत त्यांचा समाचार घेतला. शहरातील नागरीकांनी यापूर्वी ज्या पद्धत्तीने प्रेम माझ्यासह पक्षावर ठेवले त्याच पद्धत्तीने आगामी काळातही ते ठेवावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रसंगी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पालिका निवडणुकीत दिलेले प्रत्येक आश्वासन पूर्ण करणार असल्याची ग्वाही देत शहरातील प्रत्येक प्रभागात दोन स्वतंत्र नाना-नानी पार्क उभारणार असल्याची माहिती नगराध्यक्षांच्या हवाल्याने दिली.
45 वर्षानंतर उजळले रींग रोडचे भाग्य
तब्बल 45 वर्षांपासूनच्या अधिक काळापासून रखडलेल्या रींग रोडचे प्रत्यक्षात शनिवारी भाग्य उजळले. माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या हस्ते रस्ता कामाचे भूमिपूजन तसेच फलक अनावरण करण्यात आले.
संपूर्ण रींग रोडचा प्रश्न मार्गी लावणार -आमदार
तीन कोटींची रींग रोडच्या कामासाठी मान्यता असून इतक्या अल्प निधीत संपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण होणार नाही त्यामुळे चार कोटी 80 लाखांचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून यावल नाका ते पुलापर्यंतच्या रस्त्याचे कामही त्यात समाविष्ट करण्यात आल्याचे आमदार संजय सावकारे म्हणाले. गुणवत्तेचा दर्जा राखून काम केले जाणार असून भुसावळ शहराला लागून असलेल्या मात्र पालिका हद्दीत समाविष्ट नसलेल्या ग्रामीण तसेच प्रांतांच्या अखत्यारीतील भागातील रस्ता कामांसाठी दोन कोटी 20 लाख रुपये खर्चून कामे होणार आहेत. ग्रामीण रुग्णालयासह ट्रामा केअर सेंटरचे काम पूर्णत्वाकडे आले असून लवकरच पदे मंजूर होतील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. विरोधकांनी मालमत्ता विकून शहराचा विकास करण्याचे सांगितले होते मात्र प्रत्यक्षात त्यांच्या मालमत्ता सरकारजमा झाल्या व त्यांनी आता काही मालमत्ताही घेतल्याचे कुणाचेही नाव न घेता ते म्हणाले. 2011-16 या काळातील तत्कालीन सत्ताधार्यांनी ईपीएफचे दोन कोटी न भरल्याने पालिकेचे खाते सील करण्यात आले तर आता ही रक्कम भरण्यात आल्याचे सांगून आमदार म्हणाले की, तत्कालीन सत्ताधार्यांनी केलेली घाण आम्ही आता निस्तरत आहोत व उलट हे विरोधक आम्ही काय केले? असे विचारत असल्याचे ते म्हणाले.
होय, आपले सरकार ; आश्वासने पूर्ण होणार -नाथाभाऊ
आपले सरकार असल्याने निधीची कमतरता नाही त्यामुळे वर्षभरात मोठ्या प्रमाणावर निधीची उपलब्धता झाल्याने विकासकामे मार्गी लागत असून निवडणुकीत दिलेले प्रत्येक आश्वासन पूर्ण करू, असे माजी मंत्री एकनाथराव खडसे म्हणाले. अमृत योजनेमुळे 25 वर्ष पाण्याची चिंता करण्याचे काम राहणार नाही शिवाय सात वर्ष कराराच्या एलईडी दिव्यांमुळे पालिकेचा वीज बिलासह मेन्टेनन्सचा खर्च वाचणार असून एकाचवेळी सात पालिकांचे करार केल्याने कामास दिरंगाई होत असल्याची कबुली खडसे यांनी देत डिसेंबरअखेर काम पूर्ण, असे सांगितले. खासदारांच्या निधीतून शहरातील प्रमुख चौकात शंभर हायमास्ट दिवे लावण्यात येणार असून पालिकेने दत्तक घेतलेली उद्याने विकसीत करण्याचे कार्य हाती घेतले आहे शिवाय प्रत्येक वॉर्डात दोन नाना-नाकी पार्क असतील, अशी ग्वाही खडसेंनी दिली. मागासवर्गीय समाजासाठी प्रशस्त हॉल बांधण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला.
भुसावळात विकासाचा यज्ञ -नगराध्यक्ष रमण भोळे
रींग रोडमुळे आगामी काळात अपघातांची मालिका थांबणार असून अवजड वाहतुकीमुळे अनेेक अपघात पहावे लागले मात्र या कामामुळे विद्यार्थी तसेच पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. नाथाभाऊ, खासदार व आमदारांच्या नेतृत्वात शहरात विकासकामांचे पर्व सुरू असून या विकासाच्या यज्ञात हा रींग रोड म्हणजे समीधा टाकण्याचा प्रयत्न आहे, असे नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाले. शहरात आगामी काळात अनेक आमुलाग्र बदल होणार असून निश्चितच निवडणुकीतील आश्वासने आमच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करू, असा विश्वास नगराध्यक्ष भोळे यांनी व्यक्त केला.
अडीच कोटींची तांत्रिक मान्यता -सुनील नेवे
रींग रोडच्या कामासाठी तीन कोटींची मान्यता तर अडीच कोटींची तांत्रिक मान्यता असून एकूण एक किलोमीटर 10 मीटर लांबीचा चौपदरी रस्ता होणार असून त्यात 400 मीटर अंतराच्या गटारी तसेच डिव्हायडर होणार असल्याचे प्रास्ताविकात भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे यांनी सांगितले.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, युवराज लोणारी, अॅड.बोधराज चौधरी, महेंद्रसिंग ठाकूर, मुकेश पाटील, मुकेश गुंजाळ, गिरीश महाजन, भाजयुमोचे अनिकेत पाटील, निक्की बत्रा, सतीश सपकाळे, दीपक धांडे, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, वसंत पाटील, दिनेश नेमाडे, राजू खरारे, शैलजा पाटील, खासदारांचे स्वीय सहाय्यक मनोज पिंपळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मौर्य, शाखा अभियंता एस.वाय.कुरेशी, साळुंखे यांच्यासह प्रभागातील नागरीक उपस्थित होते.