शहादा । श हादा तालुक्यातील सुसरी नदीवर शासनाने सुसरी प्रकल्प तयार केला आहे. मात्र अनेक वर्ष होऊन ही ह्या प्रकल्याचा शेतकर्यांना काहीच उपयोग नाही. कारण येथे पाटचार्याच नसल्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात ह्यात पाणी तर साठवले जाते मात्र त्या पाण्याचा शेतकर्यांसाठी काहीच उपयोग होत नसल्याने शेतकर्यांमध्ये आक्रोश पसरला आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शहादा तहसील कार्यालयाजवळ आमरण उपोषण सुरु केले असून जो पावेतो शेतकर्यांना सुसरी प्रक ल्पातून पाटचार्यांद्वारे पाणी उपलब्ध होणार नाही तो पावेतो आमरण उपोषण सोडणार नसल्याचे पदाधिकार्यांनी सांगितले आहे.
प्रकल्पाची सुरुवातीची किंमत 288.29 लक्ष आता 3500.00 लक्षांपर्यंत पोहोचला
प्रत्यक्षात प्रकल्पाची स्थिती खुपच दयनीय असल्याचे वास्तव दिसते आहे. सुसरी प्रकल्पावर मार्च 2014 पर्यंत 2864.00 लक्ष रुपये खर्च होऊनही शेतकर्यांसाठी मात्र याचा उपयोग काहीच नाही हे वास्तव आहे. प्रकल्पासाठी 20-25 वर्ष लागतात ज्या प्रकल्पाची सुरुवातीची किंमत 288.29 लक्ष होती तो प्रकल्प पुर्ण होई पावेतो 3500.00 लक्षापर्यंत पोहोचला आहे. इतका मोठा खर्च करुनही अजूनही हा प्रकल्प निरुपयोगीच ठरत आहे. कोट्यावधी रुपये खर्च होत असतांना फायदा मात्र काहीच नाही ही अवस्था यात ह्या प्रकल्पाची झालेली असल्यामुळे शेवटी शेतकरी स्वतःच स्वतःच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले आहेत.
अजूनही ही योजना खडलेलीच
ह्या प्रकल्पाविषयी संघटनेचे जिल्हाध्यक्ष घनश्याम चौधरी व तालुकाध्यक्ष तसेच उपोषणकर्ते वसंत एस. पाटील यांनी दिलेल्या व शासनाकडून उपलब्ध क रुन दिलेल्या माहितीनुसार शासनाने लघुपाटबंधारे योजने अंतर्गत 288.29 खर्चास तब्बल 28 वर्षापुर्वी ह्या योजनेस मंजुरी दिली मात्र अजूनही ही योजना खडलेलीच आहे. प्रकल्पाचे काम 2006 साली पुर्ण झाले आणि त्या प्रकल्पात 2007-2008 पासून पाणी अडविण्यात आले.