शहादा नगरपालिकेत दोन गटांत सिनेस्टाईल हाणामारी

0

शहादा। शहादा नगरपालिकेत विशेष सभेमध्ये विकासकामांच्या मुद्द्यावरून शाब्दिक चकमकीचे रूपांतर थेट हाणामारीत झाल्याने एकच खलबल उडाली. आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास नगरसेवक संजय साठे व माजी नगरसेवक संजय चौधरी या आजी-माजी नगरसेवकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. पोलीसा तत्काळ घटनास्थळी येत या वादावर पडदा टाकला. पालिकेच्या आवारातील हा दांगडो पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती.

पाच विषयांसाठी विशेष सभा : शहादा पालिकेत पाच विषयांसाठी विशेष सभा 11 वाजता घेण्यात आली होती. सभेच्या कामकाजात या पाचही विषयावरती वादळी चर्चा झाली होती. सभा संपल्यानंतर पालिकेच्या मुख्य कार्यालयाबाहेरील आवारात उपनगराध्यक्षा रेखा चौधरी यांचे दीर संजय चौधरी व नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांचे पुञ अभिजीत पाटील, नगरसेवक प्रशांत निकुंभ, नगरसेवक संजय साठे, नगरसेवक संदिप चौधरी यांच्यात विकास कामावरून शाब्दिक चर्चा सुरू होती. सुरवातीला साधारण वाटणार्‍या या चर्चेने काही वेळातच सिनेस्टाईल हाणामारीचे रूप घेतले. यावेळी काहींच्या हातात क्रिकेटच्या बॅटही होत्या. या हाणामारीचे वृत्त पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत ताफ्यासह घटना स्थळी पोहचल्याने मोठा अनर्थ टळाला. घटनेनंतर दोन्ही गटांना पोलीस स्टेशनला नेण्यात आले. शहरात या घटनेने तणावपूर्ण वातावरण पसरले होते.

शहादा पोलिसांत परस्पर फिर्यादी
या हाणामारीनंतर शहादा पोलिसांत परस्पर फिर्यादी दाखल झाल्या आहेत. उपनगराध्यक्ष रेखा चौधरी यांनी चौघांविरोधात विनयभंगाची तर नगरसेवक संजय साठे यांनी तिघांविरोधात मारहाण व जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. रेखा चौधरी यांच्या फिर्यादीनुसार विकासकामांबाबत विषयांना मंजुर का केले नाही असे सांगून धक्काबुक्की केल्याने अभिजीत पाटिल, नगरसेवक संजय साठे, संदिप चौधरी, राजु साठे यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. नगरसेवक संजय साठे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लाथाबुक्यांनी मारहाण, जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने संजय ताराचंद चौधरी, भरत ञ्यंबक चौधरी व किसन भानुदास चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास सपोनि संजय चौव्हाण करीत आहे.