शहादा शहरातील आडत मार्केटमधील भाजीपाला लिलाव बेमुदत बंद

0

शहादा : येथील मुख्य भाजी मार्केट कंटेनमेंट झोनमध्ये असल्याने गेल्या एक महिन्यापासून बंद आहे. प्रशासनाकडून पर्यायी जागा उपलब्ध होत नाही तोपर्यंत मुख्य भाजीपाला आडत मार्केटमधील लिलाव पद्धत बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती शहादा तालुका भाजीपाला मार्केट व्यापारी कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष दशरथ चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शहादा येथील भाजीपाला मार्केटमधील आडत व्यापाऱ्यांनी एकत्रित येत मार्केट बंद असल्याबाबत तसेच कायमस्वरूपी जागा मिळावी अशी मागणी केली आहे. शहरातील पालिका हद्दीतील वार्ड क्रमांक सातमधील आरक्षण क्रमांक १७ वरील जागेत सुमारे ३५ ते ४० वर्षांपासून आजतागायत भाजीपाला व आडत व्यवसाय सुरु होता. परंतु सध्या शहरात कोरोना विषाणू बाधित रुग्ण सापडल्यामुळे भाजी मार्केटचा परिसर हा कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे. यासंबंधी उद्या जिल्हाधिकार्‍यांना संघटनेतर्फे निवेदनही देण्यात येणार आहे.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष दशरथ चौधरी, उपाध्यक्ष युसुफ मन्सूरी, सचिव खंडू बच्छाव, विनायक पवार, भरत दुरंगी, कैलास चौधरी, राजेंद्र वाघ, दीपक पाटील, भिका चौधरी आदींसह आडत व्यापारी उपस्थित होते.