शहादा। शहरात बेकायदेशीर नळकनेक्शनची संख्या अधिक झाल्याने परिणामी काही वसाहती पाण्यापासुन वंचित होत असल्याने नागरिकांचा रोष नगरपालिका प्रशासनावर होत आहे. नगरपालिकेने याबाबत स्वतंत्र मोहीम राबवुन पायबंद लावावा अशी मागणी नागरिक करीत आहेत. शहादा नगरपालिका एका बाजुला शहर हागणदारी मुक्ती करण्यासाठी विविध उपाययोजना करीत आहे. त्यात चांगला यश मिळाले आहे. आरोग्य ,स्वछता ,शिक्षण हे प्रश्न असताना सर्वात मोठा प्रश्न बेकायदेशीर नळकनेकशनचा आहे.
दरवर्षी मोठ्या प्रमाणात भरतात पाणीपट्टी
जे नागरिक सातत्याने दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी भरतात. त्यानाच पाणी मिळत नाही. नगरपालिका कोणत्याहीप्रकारे दखल घेत नाही. त्यामुळे एखाद्यावेळी मोठा अनर्थ घडु शकतो. अश्या बेकायदेशीर नळ कनेकशन धारकावर कायदेशीर कार्यवाही करावी व गुन्हे दाखल करावेत. काहीनी तर सेवाभावी संस्थाच्या नावावर नळजोडणी केली आहे. त्याला कोणतेही आधार नाही. नगरपालिकामार्फत शहरात असे बेकायदेशीर नळ कनेक्शन बंद करण्याबाबत आव्हान करावे. नगरपालिकेने यासाठी स्वतंत्र मोहीम राबवावे.
तीनशेपेक्षा अधिक बेकायदेशीर नळ
तीनशेपेक्षा अधिक बेकायदेशीर नळ शहरात आहेत. नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यानी याबाबत दखल घ्यावी अशी नागरिकांची मागणी आहे. पाणी पुरवठा योजनेची जुनी पाईपलाइन आहे त्यातूनच अवैध कनेक्शन घेतले आहे. नवीन पाईपलाइन अजुन कार्यान्वित केलेली नाही. सध्या जुन्याच पाईपलाइनीने पाणीपुरवठा होतो आहे. या बेकायदेशीर नळकनेक्शनची संख्या आणि नागरी सुविधा याकडे पालिकेने लक्ष द्यावे याकरिता नागरिक मागणी करीत आहेत.
वेळोवेळी राजकारण्यांचा हस्तक्षेप
आजपर्यंत कोणीही प्रयत्न केला नाही केवळ एक वेळा तत्कालीन नगराध्यक्ष रामदास हरी पाटील यानी त्यांच्या कार्यकाळात प्रयत्न केला होता. वेळोवेळी राजकारणाचा हस्तक्षेप होत असल्याने दिवसेंदिवस ही संख्या वाढत आहे. जास्त लोकसंख्या व वर्दळ असलेल्या भागात बेकायदेशीर नळकनेक्शनची संख्या जास्त आहे. अधिकृत नळधारकाने चार चार पाच पाच कनेकशन परस्पर जोडले आहे. काहीनी तर अक्षरशः जलवाहिनीला पाइप जोडून रस्ता खोदुन लांब लांब अंतरापर्यत बेकायदेशीर नळ लावले आहेत. ते कायमस्वरूपी सुरु रहातात. त्यांना तोट्या बसवलेल्या नसतात. म्हणून पाणी वाया जाते .पुढील वसाहतीना पाणी पोहचत नाही.