नंदुरबार । विहिर दुरुस्तीच्या मंजूर अनुदानातील 13 हजारांची रक्कम लाच म्हणून स्वीकारणार्या शहादा पंचायत समितीच्या कृषी अधिकार्याला नंदुरबार एसीबीने सोमवारी दुपारी साडेपाच वाजेच्या सुमारास नंदुरबार शहरातील नेहरू पुतळ्याजवळून अटक केली. अनिल गोपाळ कांगणे (रा.नंदुरबार) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. शहादा तालुक्यातील लंगडी भवानी गावातील शेतकर्याने या संदर्भात तक्रार नोंदवली होती.
यांनी केली कारवाई
नंदुरबार एसीबीचे उपअधीक्षक शिरीष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संगीता पाटील, निरीक्षक करुणाशील तायडे, उत्तम महाजन, संजय गुमाने, दीपक चित्ते, अमोल मराठे, संदीप नावाडेकर, मनोज अहिरे, ज्योती पाटील, मनोहर बोरसे, सचिन परदेशी आदींनी ही कारवाई केली, दरम्यान आरोपीच्या नंदुरबार येथील घराची झडती घेतली असता आक्षेपार्ह काहीही आढळले नसल्याचे समजते.
सापळा रचून केली अटक
शहादा तालुक्यातील लंगडी भवानी गावातील शेतकर्यास आदिवासी उपयोजनेंतर्गत विहिर दुरुस्त करण्याकामी शासनाकडून 50 हजारांचे अनुदान मंजूर होवून ते त्याच्या बँक खात्यात जमा झाले होते. आरोपी कृषी अधिकार्याने तुमचे अनुदान मंजूर केल्याने त्या पोटी 13 हजारांची रक्कम द्यावी, अशी मागणी शेतकर्याकडे केल्यानंतर नंदुरबार एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली. नंदुरबार शहरातील नेहरू पुतळ्याजवळील जय मल्हार रसवंतीसमोर आरोपीला लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली.