शहाद्यात चोरी ; हजाराच्या रोकडसह चोरट्यांनी लांबवल्या चाव्या

0

शहादा– शहरातील श्रीराम कॉलनीतील बंद घरातून चोरट्यांनी एक हजारांच्या रोकडसह महाराष्ट्र बँकेच्या तिजोरीच्या चाव्या लांबवल्याने खळबळ उडाली आहे. श्री राम कॉलनी प्लॉट नं. 27 मध्ये महाराष्ट्र बँकचे कॅशीयर योगेश रोहिदास नुकते हे त्यांचा मित्र व महाराष्ट्र बँकेचे क्लर्क चेतक किसान भुरे हे गेल्या पाच वर्षापासून एकत्र राहतात. 27 एप्रिल रोजी नुकते यांनी दिवसभर बँकेचे काम केले व सायंकाळी 6.30 वाजता सर्व कामकाज आटोपत बँकेची तिजोरी बंद केली. चावीचा एक सेट आपल्याकडे व दुसरा सेट कॅश ऑफीसरकडे असल्याचे त्यांनी सांगितले. कामकाज आटोपल्यावर योगेश नुकते घरी आले. बँकेला चार दिवस सुटी असल्याने ते त्यांचा गावी धुळे येथे निघुन गेले व एक तासानंतर त्यांचे मित्र चेतक भुरे हे देखील त्यांचा गावी निघुन गेले. 2 मे रोजी जेव्हा ते घरी आले त्यावेळी घराची बाहेरील कडी लावलेली होती व कुलूप तोडलेले आढळले. घराच्या आत गेल्यावर सर्व कपडे अस्ताव्यस्त अवस्थेत दिसले व बॅगेत ठेवलेले हजार रुपये व बँकेचा चावीचा सेट चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरट्यांचा बँकेच्या लॉकची चावी चोरण्याचा नेमका उद्देश काय? विशेष म्हणजे 2 मे ला दिवसभर बँकेत ग्राहकांना पैसे नाहीत म्हणून खोळंबत ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. या प्रकाराबाबत पोलिसांकडून अधिक माहिती घेतली जात आहे.