शहाद्यात मुख्याधिकारी राज!

0

– मुख्याधिकार्‍यांच्या फतव्याने सदस्यांमध्ये नाराजीचा सूर; नागरिकांकडून मात्र स्वागत
– नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह सर्वच नगरसेवकांना दिला तीन पानी ‘लखोटा’

शहादा : शहादा नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्‍यांनी नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांवर आचारसंहिता लावल्याने पालिका वर्तुळात एक चर्चेचा विषय ठरला आहे. मुख्याधिकार्‍यांनी नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांनी दैनंदिन प्रशासन चालवितांना वारंवार हस्तक्षेप न करण्याच्या, मंजुर नसलेली कामे न करण्याच्या, तसेच बेकायदेशीर व नियमबाह्य ठराव मंजूर केल्यास ठरावाच्या बाजूने मतदान करणार्‍या सदस्यांना कायदेशीर अडचण ठरू शकते, अशा तेवीस सूचनांचे तीन पानी पत्र नगराध्यक्ष व नगरसेवकांना दिले आहे.

पालिका वर्तुळात चर्चेचा विषय
गेल्या नोव्हेंबर महिन्यात शहादा नगरपरिषदेची निवडणूक होऊन २२ डिसेंबर रोजी नूतन नगराध्यक्षांनी पदभार स्विकारला होता. यावेळच्या नविन सदस्यांमध्ये नगराध्यक्षांसह बहुतेक सदस्य नवीन असल्याने त्यांना पालिकेच्या कामकाजाची, प्रशासनाची, नगरपालिका कायद्याची माहिती व्हावी म्हणून मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांनी नगराध्यक्ष , उपनगराध्यक्षांसह सर्वच नगरसेवकांना तीन पानी ‘लखोटा’ पाठवून पालिका नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. मुख्याधिकार्‍यांनी नगराध्यक्ष व नगरसेवकांना अशा प्रकारची सूचना वजा आदेश देण्याची शहादा पालिकेतील ही पहिलीच घटना असल्याने पालिका वर्तुळात तो चर्चेचा विषय झाला आहे.

२३ सूचनांचा समावेश
मुख्याधिकारी गवळी यांनी सदस्यांना दिलेल्या पत्रात नगरपरिषदेचे प्रशासकीय प्रमुख मुख्याधिकारी असतात. त्यामुळे दैनंदिन प्रशासन चालवितांना पदाधिकार्‍यांनी हस्तक्षेप करणे हे बेकायदेशीर असल्याचे नमूद केले आहे. पदाधिकार्‍यांनी परस्पर कुठल्याही कर्मचार्‍यांना अनावश्यक सूचना देऊ नये, मंजूर नसलेली कामे करण्यास भाग पाउू नये, नगरपरिषदेची कुठलीही सार्वजनिक मालमत्ता राज्य शासनाच्या मंजुरीशिवाय हस्तांतर करू नये, पालिकेकडे पुरेसा निधी नगरल्यास कुठलेही मंजूर काम करू नये, अशा कडक सूचना मुख्याधिकार्‍यांनी सर्व सदस्यांना केल्या आहेत. मालमत्ता कर, पाणीपट्टी, दुकानभाडे, दुकान डिपॉझिट व इतर येणी वसूल करण्यास पदाधिकार्‍यांनी अडथळा आणू नये, सदस्यांनी वैयक्तीकरित्या कुठलेही धोरणात्म्क निर्णय घेऊन नये तसेच पालिकेची वाहने व इतर साधन सामुग्रीचा वैयक्तीक लाभ घेऊ नये अशीही सक्त ताकीत मुख्याधिकार्‍यांनी दिली आहे.

नगरसेवकांची नाराजी
शहराचे विद्रुपीकरण होईल, अशा पद्धतीने दुकाने लावणे, टपर्‍या टाकणे, होल्डिंग्ज/ बॅनर्स लावणे, अतिक्रमण करणे, सार्वजनिक रस्त्यांना अडथळा आणणे अशा कुठल्याही बाबींना सदस्यांनी प्रोत्साहन दिल्यास अथवा सहकार्य केल्यास त्या सदस्याचे अपात्रेबाबत तरतूद असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. पालिका सदस्य आपले कर्तव्य बजावत असतांना कोणतेही गैरवर्तन केल्यास सदस्यांना अपात्र ठरविले जाऊ शकते किंवा पदावरून दूर केले जावू शकते, असा इशारा मुख्याधिकार्‍यांनी या पत्रातून दिला आहे. आदेश दिल्याने नविन सदस्यांमध्ये चलबिचल वाढली आहे. मुख्याधिकार्‍यांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केले तर नगरसेवकपदाचा रूबाब करता येणार नाही आणि सूचना पाळल्या नाहीत तर कायद्यात सापडू अशी द्विधा अवस्था सदस्यांची झाली आहे. मुख्याधिकार्‍यांच्या या फतव्याने सदस्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत असले तरी या फतव्यामुळे या पुढील काळात पालिकेचा कारभार चांगला चालेल अशी नागरिकांना आशा असल्याने नागरिकांककडून मात्र या फतव्याचे स्वागत होत आहे.