शहादा। शहरात रमजान ईद शांततेत साजरी झाली. मात्र गरीब नवाज कॉलनी परिसरात दरवर्षापेक्षा यावर्षी नगरपालिकेचे बांधकाम सभापती सद्दाम तेली यांच्या खुनाचा परिणाम झाल्याने उत्साह कमी होता.तर सद्दाम तेली याच्या नातेवाईकानी व कार्यकर्त्यांनी नमाज पठण करुन घरीच रहाणे पसंत केले.सद्दाम तेली यांच्या खुनानंतर झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर गरीब नवाज कॉलनीसह शहरात मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. सकाळी साडे नऊ वाजता खेतीया रस्त्याला लागुन असलेल्या ईदगाह मैदानावर मुस्लीम बांधवानी सामूहिक नमाज पठण व इतर बांधवांनी कब्रस्तानाजवळील मशिदीत नमाज पठण केले.
मान्यवरांनी मुस्लिम बांधवाना दिल्या शुभेच्छा
यावेळी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी एम. बी. पाटील,तहसिलदार मनोज खैरनार,नायब तहसीलदार डॉ.उल्हास देवरे,पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, भगवान पाटील उपस्थित होते. या सर्व मान्यवरांनी मुस्लीम बांधवाना ईदच्या शुभेच्छा दिल्या.विशेष म्हणजे यावर्षी कोणतेही राजकीय नेते नगरसेवक उपस्थित नव्हते.खेतीया रस्त्याला लागुन बाजुला सद्दाम तेली यांचे श्रध्दांजलीचे मोठे डिजीटल फलक लावण्यात आले होते या फलकाच्या शेजारीच मुस्लीम बांधवांची मोठी गर्दी होती.सद्दाम तेलीचे समर्थक फलकाजवळ उभे रहावुन ईदच्या शुभेच्छा देत व घेत होते. गरीब नवाज कॉलनी परीसरात त्याची आठवण केली जात होती. नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांनी सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत प्रत्येक मुस्लीम बांधवाना शुभेच्छा दिल्या. दरवर्षी तीन मंडप असायचे यावर्षी एकच मंडप लावण्यात आला होता तोही पोलीस प्रशासनाचा होता.