शहादा: शहरात कोविड -19 विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळून आल्यानंतर प्रशासनाने शहरातील प्रभात सात व चार प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला. प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणी किराणा दुकान सकाळी आठ ते बारा यावेळेस उघडण्यास परवानगी दिल्याने तब्बल आठ दिवसापासून प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणार्या शहरवासियांना थोडीशी सूट मिळताच सोशल डिस्टन्िंसगचा फज्जा उडवत बाजार घेण्यासाठी दुकानांवर एकच गर्दी केली. शहरात एकापाठोपाठ एक रुग्ण संख्या वाढत असूनही नागरिक अजूनही गांभीर्याने घेत नसल्याचे दिसत आहे.
शहादा शहरातील प्रभाग क्रमांक सातमध्ये सापडलेल्या पहिल्या कोरोना बाधिताच्या मृत्यूनंतर प्रभाग चारमध्ये पुन्हा कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने बाधितांची संख्या चार झाली आहे. प्रशासनाने स्थानिक पातळीवर उपाययोजना केल्या आहेत. रुग्ण सापडलेला भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. इतर भाग बफरझोन म्हणून घोषित केला आहे. प्रशासनाने नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर निघू नये हे वारंवार सांगूनही रविवारी अक्षय तृतीयेचा सण होता. त्यामुळे किराणा घेण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांनी सोशल डिस्टन्िंसग सारख्या गोष्टीला तिलांजली दिल्याचे निदर्शनास आले. वास्तविक पाहता आठ ते दहा बारा ही वेळ प्रशासनाने दिली होती. हा वेळ खरेदीसाठी पुरेसा आहे. तरीही एकाचवेळी शहरातील नागरिकांनी खरेदी करण्यासाठी झुंबड केल्याने शहरात कोरोना विषाणू येऊनही अद्यापही नागरिकांचा गाफिलपणा कायम जाणवत आहे.
आंबा विक्रेत्यांची चांदी
अक्षय तृतीयेच्या दिवशी आंब्याला विशेष महत्व आहे. याच दिवशी आमरस व पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. परंतु यंदा प्रथमच नागरिकांना आंबे घेण्यासाठी कसरत करावी लागली. त्यात काही विक्रेत्यांनी अव्वाच्या सव्वा दर लावला होता. पैकी काही नागरिकांनी आंबे खरेदी करणे टाळले. मात्र, अव्वाच्या सव्वा दरात विकणार्या विक्रेत्यांवर कोणाचाही वचक नसल्याने एका दिवसात आंबा विक्रेत्यांची चांदी झाल्याचे दिसून आले.