शहादा । शहरात कमी दाबाच्या विद्युत पुरवठा होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत तर ग्रामीण भागातील शेतकरी संकटात सापडला आहे .व्यावसाय करण्यासाठी त्यांना कसरत करावी लागत आहे. गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून उन्हाळ्याला सुरुवात झाल्याबरोबर वीज समस्या निर्माण झाली आहे. विजेचा दाब कमी प्रमाणात होत असल्याने शेतकर्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
केबल टाकण्याचे काम
शेतकर्यांना रात्री उशीरा विद्युत मोटारी सुरु करायला जावे लागत असून शेतातील पिके वाचण्यासाठी मेहनत घ्यावी लागत आहे. आधीच ग्रामीण भागात विजेची कपात मोठ्या प्रमाणात केली जात आहे. केवळ आठ तासच विद्युत पुरवठा होत असतो, तर मे महिन्यात विजेची समस्या अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. उन्हाळा लागल्याने विजेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे मागणी वाढली आहे पंखे, कुलर, वातानुकुलीत यंत्रे यांना जास्त वीज लागत असल्याने विजेचा दाब कमी होत असल्याचे सांगण्यात येत आहे. शहरात एकुण 175 ट्रांसफॉर्मर आहेत सर्वाना आर्थिंग मिळत नाही, अर्थिंग साठी ओलावा लागतो तो उन्हाळात नसतो म्हणून हा मोठा परिणाम विजेचा दाबावर होतो अशी माहिती विद्युत वितरण विभागाने दिली याबाबत उपाययोजना म्हणून 7 ते 8 मेगा वॅटचा केबल टाकल्या जात आहेत. काही वसाहती मध्ये ट्रांसफार्मरचा क्षमतेपेक्षा जास्त विद्युत पुरवठा लागत असल्याने विजेचा दाब कमी प्रमाणात मिळत आहे. म्हणून नागरिकांनी विजेचा वापर काटकसरीने करावा विजेचा अपव्यय टाळावा असे आव्हान विद्युत वितरण विभागाने केले आहे.