शहापूर (जितेंद्र भानुशाली)। शहापूर तालुक्यातील 113 गावांचा पाणीटंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी भावली धरणातून पाणी योजना करावी ही संकल्पना आमदार पांडुरंग बरोरा यांचीच होती. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, शासकीय वरिष्ठ अधिकारी, आदींनी सहकार्य केल्यामुळे ह्या योजनेच्या वाढीव माणसी 70 लिटर पाणी आरक्षणाला अंतिम मंजुरी मिळाली आहे. ही योजना कशी महत्वाची व गरजेची आणि दीर्घकाळ टिकणारी आहे हे पटवून देण्यात स क्रय असणारे आमदार पांडुरंग बरोरा यांच्या चिकाटीमुळेच ही योजना मंजूर झाली आहे. त्यामुळे शहापूर तालुका काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महेश धानके यांच्यासह तालुक्यातील अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, आमदार पांडुरंग बरोरा यांच्यासह सर्वांचे आभार मानले आहेत. ह्या योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मंत्रालयात आयोजित विशेष बैठकीत पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार कपिल पाटील, आमदार पांडुरंग बरोरा, आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीतभावली पाणीपुरवठा योजनेच्या वाढीव पाणी आरक्षणाला अंतिम मंजुरी दिल्याने 97 गावे आणि 259 पाड्याची पाणी टंचाई दूर होणार आहे.
बैठकीत जिल्हा परिषद, ठाणे यांनी सादर केलेल्या भावली योजनेबद्दलच्या माहितीनुसार शहापूर तालुक्यातील 97 गावे आणि 259 पाडे, वाड्या- पाड्यासाठी इगतपुरी तालुक्यातील भावली धरणातून शहापूर प्रादेशिक नळ योजना ग्रीड गुरुत्वाकर्षण पध्दतीने होणार आहे. भावली धरण समुद्रसपाटीपासून 597 मीटर उंचीवर असून ग्रीडद्वारे गुरुत्वाकर्षण पद्धतीने टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. मुबई, ठाणे, मीरा भाईंदर, भिवंडी ह्या शहरांना शहापूर तालुक्यातील धरणांमधून पाणीपुरवठा होतो. मात्र तालुका टंचाईग्रस्त असल्याने लोकांमध्ये रोष आहे. ह्या भावली योजनेतील सहभागी असलेल्या 41 ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत पाणीपट्टीची सहमती दिली आहे. ह्या योजनेत कसारा, खर्डी, आसनगाव, गोठेघर, शहापूर, चेरपोली, इत्यादी झपाट्याने लोकसंख्या वाढणार्या गावांचा समावेश आहे. ही योजना गुरुत्वाकर्षण ग्रीड पद्धतीने असल्याने देखभाल दुरुस्तीचा खर्च अत्यल्प येणार आहे.
प्रत्येक घरात नळजोडणी
भावली धरणाची क्षमता 44.75 दश लक्ष घनमीटर इतकी असून जिवंत साठा 40.79 दश लक्ष घनमीटर तर सध्या मंजूर पाणी आरक्षण 4.55 दश लक्ष घनमीटर इतका आहे. भावली धरणाला कॅनॉल नसून धरणातील पाण्याचा कृषिसाठी वापर होणार नाही. मात्र ह्या योजनेत शंभर टक्के घरात नळ कनेक्शन देण्यात येणार आहे.