शहापुर । काही दिवसांपूर्वी शहापूर तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींना स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला असतानाच काल शासनाच्या राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्काराचे मानांकन शहापुर तालुक्याला मिळाले, तर कुडशेत व वांद्रे या दोन गावांना जलमित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. याबाबत विष्णू शिर्के यांनी दिलेल्या माहितीनुसार शासनाच्या जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत उत्कृष्ट काम केल्यामुळे विभाग स्तरावर शहापूर तालुक्यासाठी राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार व प्रथम क्रमांकाचे मानांकन नुकतेच देण्यात आले. रत्नागिरीतील सावरकर सभाग्रुहामध्ये हा पुरस्कार साोहळा संपन्न झाला. राज्याचे जलसंधारण मंत्री यांचे हस्ते शहापुर तालुक्यातील मळेगाव ग्रामपंचायत हद्दीतील कुडशेत गावाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार व प्रथमक्रमांकाचा मान तर तालुक्यातील वांद्रे गावाला द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
पाझर तलाव केले दुरुस्त
कुडशेत गावासाठी पुरस्कार मिळण्यामागे येथील कार्यकर्ते काळुराम उघडा, विष्णु शिर्के, तालुका क्रुषी अधिकारी अजय पाटील, जि.प.पाटबंधारे व वन विभागाच्या अधिकार्यांनी महत्वाचे योगदान दिल्यामुळे सन 2015-16 या वर्षाकरीता हा पुरस्कार देण्यात आला असल्याचे माहिती देताना विष्णु शिर्के यांनी सांगितले. तसेच तालुक्यातील या कुडशेत गावासाठी यापुर्वी रस्ता नव्हता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती, अशा परिस्थितीत येथील नागरिकांना बैलगाडीने सात कि.मी. अंतरावरून पाणी आणावे लागत होते. मात्र काळुराम उघडा व विष्णु शिर्के यांनी जि.प.पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा करून पाझर तलाव दुरूस्त केले. व चार काँक्रीट बंधारे बांधले त्यामुळे गावची पाणीटंचाई तर दूर झालीच, पण गावातील लोक मोठ्याप्रमाणात भाजीपाला व्यवसाय करू लागल्याने लोकांना रोजगार उपलब्ध झाला. यासर्व योजना यशस्वीपणे या ठिकाणी राबविण्यात आल्याने सरकारने दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचे कुडशेत येथील काळूराम उघडा यांनी सांगितले.