पुणे । शहरात साथीच्या रोगांचा फैलाव वाढतच चालला आहे. गुरुवारी एकाच दिवशी डेंग्यूची लागण झालेले तब्बल 24 नवीन संशयीत रुग्ण आढळले आहेत. या आठवड्यात तब्बल 104 संशयीत तर चिकुनगुनियाची लागण झालेले 8 रुग्ण आढळून आले आहेत. तर दुसरीकडे स्वाइन फ्लूची लागण झालेल्या 16 रुग्णांची परिस्थिती अतिशय गंभीर असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहेत.
शहरात गेल्या काही दिवसांपासून पडणार्या पावसामुळे ठिकठिकाणी पाण्याची स्वच्छ पाण्याची डबकी साचलेली आहेत. त्यामुळे एडीस इजिप्ती डासाची उत्पत्ती स्थानांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पालिकेतर्फे प्रभावी उपाययोजना राबवल्या जात नसल्याने हे आजार बळावत आहेत. जानेवारीपासून डेंग्यूची लागण झालेल्या संशयीत रुग्णांची संख्या तब्बल 504 झाली आहे. त्यातील तब्बल 228 रूग्ण जुलै महिन्यातील आहेत. तर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच 104 नवीन संशयित रूग्ण आढळून आले आहेत. हे रुग्ण महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत असून खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची नोंदणी पालिकेच्या आरोग्य विभागाकडे नाही. त्यामुळे साथ आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा पालिकेचा दावा फोल ठरत असल्याचे दिसून येते.