काश्मिरातील पूंछ जिल्ह्यातील कृष्णाघाटी सीमेवर काल जो प्रकार घडला, तो भारताला थेट आव्हान देणारा ठरला आहे. पाक बॉर्डर अॅक्शन टीम अर्थात ‘बॅट’च्या सैनिकांनी भारतीय सीमेत तब्बल अडीचशे मीटर आत घुसखोरी करून सीमा सुरक्षा दलाच्या गस्ती पथकावर हल्ला चढवला. या धुमश्चक्रीत नायब सुभेदार परमजीत सिंह, हेड कॉन्स्टेबल प्रेमसागर देवरिया हे दोन जवान शहीद झाले. पाकिस्तानी सैनिकांनी या जवानांचा शिरच्छेद करून त्यांची मुंडकी सोबत घेऊन गेले. विशेष म्हणजे ही घटना घडण्याअगोदर एक दिवस पाकिस्तानी लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा हे याच परिसरात होते. यापूर्वीही या पथकातील सैनिकांनी भारतीय सैनिकांच्या मृतदेहांची विटंबना केली होती. या पथकाला शिरच्छेदासाठी खास प्रशिक्षण देण्यात आले आहे. या पथकाला दहशतवाद्यांची साथ असते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीयांना मनोमन भावले, यामागे फार तुरळक कारणे होती, एक म्हणजे ते नेहमी ‘राष्ट्र’ या विषयाला प्राधान्य देतात, दुसरी ते भ्रष्टाचाराच्या विरोधात व विकासासाठी आग्रही असतात, तिसरी ते राजकारणात व्यक्तीपूजा किंवा परिवारवादाच्या विरोधात असतात आणि शेवटचे म्हणजे ते कणखर वृत्तीचे आहेत. 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांतील त्यांच्या भाषणांमध्ये त्यांनी याच चार-पाच गुणांचा खुबीने वापर करून प्रचार मुद्दे बनवले होते. त्यामुळे जनता त्यांच्याकडे आकर्षित झाली. ‘मी ज्या राज्याचा मुख्यमंत्री आहे, त्या गुजरातपासून काही अंतरावर पाकिस्तानची सीमा आहे, त्यांना भारत सरकारची जेवढी भीती वाटत नाही, तेवढी माझी वाटते’, ‘काँग्रेसच्या राजवटीत सैनिकांच्या देहाची विटंबना करण्यात आली तरी सरकार नुसते इशारे देत आहे. मला सत्ता द्या, एका सैनिकाचा जरी शिरच्छेद झाला, तर त्या बदल्यात 10 जणांची मुंडकी आणीन’, अशा त्यांच्या वक्तव्याने भारतीयांना नवा आशेचा किरण दिसला. त्यामुळे इंदिरा युगानंतर यापुढे भारतात स्पष्ट बहुतम कदापि शक्य नाही, अशी भारतीय राजकारणाची स्थिती असतांनाही नरेंद्र मोदींवर अवघ्या देशवासीयांनी विश्वास दाखवला. त्यांच्याकडे एकहाती सत्ता सोपवली. कोणताही निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य त्यांना आहे, त्याचा वापरही त्यांनी मागील तीन वर्षांच्या काळात केला आहे. नोटाबंदी, सर्जिकल स्ट्राइक यांसारखे निणर्र्य उदाहरणादाखल देता येतील. मात्र, त्यानंतर त्याचा इतका गवगवा झाला की, असे चटकदार निर्णय घेऊन त्यांचा प्रचार मुद्दा बनवायचा, अशी भाजपची रणनीती होती का, अशी शंका येऊ लागली. अर्थात त्यातील नोटाबंदीच्या निर्णयावर झालेल्या आरोपांचे अजूनही स्पष्टीकरण मिळाले नाही, असो. हे विश्लेषण करण्यामागे कारणही तसेच आहे. ज्या सर्जिकल स्ट्राइकनंतर ‘पाकला धडा शिकवला’, असा दावा मोदींनी छातीठोकपणे केला. त्याच स्ट्राइकनंतर सर्वाधिक वेळा सीमेवर पाककडून शस्त्रसंधी करण्यात आली आहे, त्यात अनेक भारतीय जवान शहीद झाले आहेत, काश्मिरात सर्वाधिक काळ अशांतता निर्माण करण्यात आली आहे आणि आता पूंछ जिल्ह्यातील कृष्णाघाटी सीमेवर दोन जवानांचा भारतीय सीमेत येऊन शिरच्छेद करून त्यांची मुंडकी पाकचे जवान सोबत घेऊन गेले आहेत. हा सर्व प्रकार पाहिल्यावर ‘56 इंच छाती’ असा प्रचार करण्यात आलेले मोदीदेखील मागील कालखंडातील माजी पंतप्रधानांच्याच रांगेतले बनले आहेत का, 2014 साली जनतेची फसवणूक झाली का, असे वाटावे, अशा या घटना एकामागोमाग एक घडू लागल्या आहेत.
जवानांच्या विटंबनेच्या प्रकारामुळे देशभरात संतापाचा लाव्हा फुटला आहे. शहीद परमजितसिंग यांच्यावर त्यांच्या कुटुंबीयांच्या इच्छेविरुद्ध अंत्यसंस्कार करण्यात आले. कारण संपूर्ण मृतदेह अर्थात परमजितसिंग यांचे मुंडके मिळाल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका त्यांच्या कुटुंबीयांनी घेतली होती, तर शहीद जवान प्रेमसागर देवरिया यांच्यावर अंत्यसंस्कार करताना त्यांची मुलगी सरोज हिने आमच्या वडिलांनी देशासाठी केलेल्या त्यागाच्या बदल्यात दुश्मनाच्या 50 जवानांचे मुंडके छाटा, अशी संतप्त मागणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर खरेतर या शहिदांच्या कुटुंबीयांनी देशवासीयांच्या माध्यमातून ही दोन आव्हाने ठेवली आहेत. तेव्हा पंतप्रधानांनी शहिद जवानांची मुंडकी, सोबत पाकच्या 50 जवानांनी मुंडकी घेऊन येण्याचे आव्हान स्वीकारावे, अशी देशवासीयांची अपेक्षा आहे, असे वातावरण सध्या देशभरात निर्माण झाले आहे. देशवासीयांच्या भावना समजून घेताना पाकिस्तान आणि काश्मीर हे दोन प्रश्न 2019च्या निवडणुकीआधीच संपतील, अशी एखादाचे घोषणा पंतप्रधानांनी करावी आणि ती पूर्ण करावी, भाजपला 2025च्या निवडणुकीची तयारी करावी लागणार नाही, जनता स्वत:च सत्ता देईल!!
नित्यानंद भिसे – 8424838659