शहिद जवान अमोल देवरे अमर रहे : कळमडूतील जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
कळमडू गावात भव्य शहिद स्मारकाची उभारणी करणार ; आमदार मंगेश चव्हाण
The martyred jawan of Kalamdu village was cremated with state pomp ! चाळीसगाव : तालुक्यातील कळमडू गावातील वीर सुपूत्र अमोल राजेंद्र देवरे यांच्या मृतदेहावर गुरुवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या पार्थिवावर शासनातर्फे पुष्पचक्र अर्पण करण्यात आले तसेच हवेत बंदुकीच्या फैरीदेखील झाडण्यात आल्या. अमोल देवरे या जवानाला कर्तव्यावर असताना वीर मरण आल्यानंतर मूळ गावी त्यांच्या मृतदेहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
कळमडूत स्मारक उभारणार
फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरमधून मृत जवानाची गावातून अंत्ययात्रा निघाली. या प्रसंगी जवान अमोल देवरे अमर रहेच्या घोषणा देण्यात आल्या. काही महिन्यांपूर्वीच तरुणाचे पितृछत्र हरवल्यानंतर देवरे कुटुंब त्या दुःखातून सावरत नाही तोच घरातील एकूलता एक मुलगा देशसेवेसाठी कर्तव्यावर असताना शहिद झाल्याने मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. दरम्यान, शहिद अमोल देवरे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आमदार निधीतून 30 लाख रुपये खर्चातून भव्य अश्या स्मारकाची उभारणी कळमडू गावात केली जाईल तसेच देवरे कुटुंबियांच्या पाठीशी सर्व तालुका उभा राहिल, अशी ग्वाही आमदार मंगेश चव्हाण यांनी यावेळी दिली.