शहीद फराटे यांच्या स्मारकासाठी जागा द्या

0

पुणे । जम्मू काश्मीरमधील पम्पोर येथे दहशतवाद्यांशी लढताना वीरगती प्राप्त झालेले शहीद जवान सौरभ फराटे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ स्मारक उभारण्यासाठी महापालिकेने तातडीने जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

फुरसुंगी येथील जवान सौरभ फराटे यांना 17 डिसेंबर 2016 रोजी पम्पोर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात कर्तव्य बजावताना वीरमरण आले. त्यांच्या अंत्यविधीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, पालकमंत्री गिरीश बापट, स्थानिक खासदार, आमदार, तत्कालीन महापौर आणि नगरसेवक उपस्थित होते. त्यावेळी फराटे यांचे स्मारक उभारण्यात येईल, असे आश्वासन शासनातर्फे देण्यात आले. त्यानुसार नुकत्याच पार पडलेल्या महापालिकेतील पक्षनेत्यांच्या बैठकीत फुरसुंगी येथे शहीद जवान सौरभ फराटे यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, त्यासाठी अद्याप कोणतीही तरतूद अथवा प्रयत्न करण्यात आलेले नाहीत.

त्या पार्श्वभूमीवर शहीद जवान सौरभ फराटे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हडपसर गाडीतळ चौकात पुलाखाली वीर शहीद स्मृती स्मारक आणि कै. रामचंद्र बनकर शाळेत शहीद सौरभ फराटे यांचा पुतळा उभारण्यात यावा, अन्यथा 17 डिसेंबरपासून आंदोलन करण्यात येईल, अशा मागणीचे निवेदन पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव प्रशांत सुरसे यांनी महापौर मुक्ता टिळक यांना दिले आहे.