पुणे । मांसाहार केल्याने शरीराला पोषक घटक मिळतात, असा बाळबोध दावा अनेकांकडून केला जातो. मात्र, मांसाहार केल्याने तामसी प्रवृत्ती, स्थूलता, दमा, हृदयविकार आणि इतर आजारांना निमंत्रण मिळते. शाकाहारात मोठ्या प्रमाणात पोषक घटक असून, शाकाहार हाच निरोगी आरोग्याचा मूलमंत्र आहे, असे मत शाकाहाराचे पुरस्कर्ते डॉ. कल्याण गंगवाल यांनी व्यक्त केले. रोटरी क्लब ऑफ पुणे सनराईजच्या वतीने आयोजित कार्यक्रमात डॉ. गंगवाल बोलत होते. याप्रसंगी क्लबचे संस्थापक बाहरी बी. आर. मल्होत्रा, क्लबचे अध्यक्ष डॉ. जयसिंग पाटील, सचिव जेनीस सोमजी, सहसचिव सिमरन जेठवानी याप्रसंगी उपस्थित होते.शाकाहार करणारी अनेक माणसे आपल्या भोवती आहेत. वयाच्या सत्तरीनंतरही ते ठणठणीत आहेत. गेली अनेक वर्षे शाकाहारावर काम करीत आहे. त्याचबरोबर पशुबळीविरोधी, व्यसनमुक्ती चळवळ उभी केली. त्याला अलीकडे यश येत आहे. शाळा-महाविद्यालयातील मुलांना शाकाहार, व्यसनमुक्ती याविषयी सातत्याने मार्गदर्शन करीत आहे. कोणत्याही चळवळीला सातत्य असले की यश मिळते, असे डॉ. कल्याण गंगवाल यांनी पुढे सांगितले.
रोटरीच्या वतीने विविध उपक्रम
रोटरी क्लबच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. फूड फॉर लाईफ हा अतिशय महत्वाचा उपक्रम आहे, असे बाहरी बी. आर. मल्होत्रा यांनी यावेळी बोलताना सांगितले. समाजात कोणीही उपाशीपोटी झोपू नये, यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करायला हवेत श्वेता चव्हाण पाटील यांनी रोटरी क्लब ऑफ पुणे सनराईजच्या वतीने बकोरी गावात सुरू असलेल्या उपक्रमांविषयी माहिती दिली. डॉ. जयसिंग पाटील यांनी प्रास्ताविक केले. जेनीस सोमजी यांनी सूत्रसंचालन तर सिमरन जेठवानी यांनी आभार मानले.