निधीत 200 रूपयाने वाढ मात्र शिक्षण विभाग संभ्रमात
भुसावळ- शासनाच्या शिक्षण विभागाने यंदाच्या वर्षापासून विद्यार्थ्यांच्या शालेय गणवेशासाठी 200 रूपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे मात्र याबाबत तालुकास्तरावरील शिक्षण विभाग संभ्रमात पडला असून निधी प्राप्त झाल्यावरच शासनाच्या निर्णयाचा उलगडा होणार असल्याचे सांगण्यात आले. राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून इयत्ता पहीली ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश दिला जातो. सुरूवातीला शालेय गणवेश शासनाकडून दिला जात होता मात्र शालेय गणवेश वाटपात घोटाळा होत असल्याचे प्रकरण समोर आल्याने शासनाने दोन शालेय गणवेशाचा निधी विद्याथ्यार्र्ंच्या खात्यावर वर्ग करण्यास सुरूवात केली आहे. मागील वर्षी प्रत्येकी एका शालेय गणवेशासाठी 200 रूपये असे 400 रूपये विद्यार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले होते मात्र वाढती महागाई लक्षात घेता शिक्षण विभागाने सर्व शिक्षा अभियान व समग्र शिक्षा अभियानातंर्गत यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून प्रत्येकी एका शालेय गणवेशासाठी 100 रूपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना दोन शालेय गणवेशासाठी 600 रूपये मिळणार आहेत.
तालुकास्तरावरील शिक्षण विभाग अनभिज्ञ
शासनाने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून पहिली ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या शालेय गणवेशासाठी 100 रूपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र अद्यापही निधी प्राप्त झाला नसल्याने या निर्णयाबाबत तालुकास्तरावरील शिक्षण विभाग अनभिज्ञ असून शासनाकडून निधी प्राप्त झाल्यावरच निर्णयाचा उलगडा होणार असल्याचे सांगण्यात आले.
पाच हजार विद्यार्थी लाभार्थी
भुसावळ तालुक्यातील जिल्हा परीषद व खासगी प्राथमिक शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गातील पाच हजार 306 विद्यार्थी शालेय गणवेशासाठी पात्र आहेत. यासाठी शिक्षण विभागाने वरीष्ठ स्तरावर निधीची मागणी केली आहे.
असा मिळणार निधी
तालुकास्तरावरील शिक्षण विभागाने पाच हजार 306 विद्यार्थ्यांच्या शालेय गणवेशासाठी निधीची मागणी केली आहे. त्यानुसार शिक्षण विभागाला शासनाच्या नविन निर्णया नुसार 31 लाख 83 हजार 600 रूपये मिळणे अपेक्षीत आह तर नवीन निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यास जुन्या निर्णयानुसार 10 लाख 61 हजार 200 रूपये मिळू शकतात.