चौघांची प्रकृती चिंताजनक
सणसवाडी : शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई येथील विद्याधाम हायस्कूलमधील पाचवी ते दहावीच्या 41 मुलांना शालेय पोषण आहारातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. त्यामधील चार मुलांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मंचर येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.विद्याधाम हायस्कूलमध्ये शिकणार्या 400 मुलांनी शनिवारी शाळेमध्येदररोज मिळणारा पोषण आहार खाल्ला आणि अचानक मुलांना उलटी, पोटदुखी, डोकेदुखी व चक्करचा त्रास होऊ लागला. या प्रकारामुळे काही मुलांना गावातीलहॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु मुलांचा आकडा वाढू लागला. काही मुलांची प्रकृती चिंताजनक होऊ लागली. यावेळी परिसरातील ग्रामस्थ व पालकांनी मोठ्या प्रमाणात शाळेमध्ये गर्दी केली होती.
पालकांकडून कारवाईची मागणी
कवठे येमाई येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉ. नामदेव पानगे व त्यांचे पथक कान्हूर मेसाईच्या शाळेत दाखल झाले. त्यांनी मुलांना तातडीने औषधोपचार सुरू केले. त्यांनतर काही मुलांच्या प्रकृतीत सुधारणा झाली परंतु चार मुलांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मंचर येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच शिरूर पंचायत समितीचे शिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर यांनी शाळेला पाहणी केली. यावेळी पालकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत शाळेकडे संचालक मंडळांनी लक्ष देणे गरजेचे असून घडलेल्या प्रकारची चौकशी करण्याची मागणी केली. तर याबाबत बोलताना मुलांना किरकोळ त्रास झाला असून सर्व मुलांची प्रकृती व्यवस्थित असून पुढील चौकशी सुरू असल्याचे विद्यालयाचे मुख्याध्यापक मच्छिंद्र माने यांनी सांगितले.