शालेय विद्यार्थ्यांची दफ्तरे झाली कार्टुनमय

0

बार्बी, डोरेमन, मिकीमाऊस, छोटा भीम, बेनटेन कार्टुनला विद्यार्थ्यांची पसंती
पुढील आठवड्यात शाळा सुरू : शालेय साहित्य खरेदीसाठी पालकांची गर्दी
पिंपरी-चिंचवड : ‘छोटा भीम’, ‘डोरेमॉन’, ‘मिकीमाउस’, ‘टॉम अँड जेरी’, ‘बार्बी’, ‘बेनटेन’ या कार्टूनची आकर्षक दप्तरे बाजारात दाखल झाली आहेत. ही दप्तरे वजनाला हलकी आणि मजबूत अशी आहेत. काही दिवसांत शाळा सुरु होणार असल्याने पालकांना शालेय साहित्य खरेदीचे वेध लागले आहेत. कार्टूनचा प्रभाव इतका आहे, की बाजारात दप्तरे सुद्धा कार्टूनमय बनवली आहेत. त्याला मागणीही चांगली आहे.

दोनशे ते तीन हजारांपर्यंत दर
शाळा सुरू होण्यासाठी काही दिवसांचा अवधी राहिल्याने पालकांची मुलांच्या शालेय वस्तूंच्या खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. शहरातील बाजारपेठेत साहित्य खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. सध्या 200 रुपयांपासून ते तीन हजार रुपयांपर्यंत विविध प्रकारची दप्तरे उपलब्ध आहेत. अनेक कंपन्यांनी दप्तरांचे विविध प्रकार बाजारांत आणले आहेत. आडव्या दप्तरांची ‘क्रेझ’ कमी झाली असून, दिवसेंदिवस वेगवेगळ्या प्रकारच्या ‘सॅक’च्या डिझाईन्सला महत्त्व प्राप्त होत आहे. खाऊचा डबा, कंपास पेटी ठेवण्यासाठी कप्पे, वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक डिझाईन याबरोबर आतील वह्या, पुस्तके ठेवण्याचे कप्पे याची पाहणी करूनच दप्तरांची खरेदी केली जात आहे.

दफ्तर भिजू नये म्हणून कव्हर
पावसाळ्यात दप्तर भिजू नये, म्हणून रेन कव्हरचीही खरेदी केली जात आहे. मुलांची आवड दरवर्षी बदलत असल्याने वेगवेगळ्या प्रकारची दप्तरे सध्या बाजारात विक्रीसाठी दाखल झाली आहेत. दप्तर आणि सॅकमध्ये अनेक प्रकार पाहायला मिळत आहेत. कार्टूनची चित्रे असलेल्या दप्तरांना अधिक मागणी आहे. सॅकमध्ये जिन्स, कॉटन जिन्स, कापडी, वॉटरप्रूफला मोठी मागणी आहे. ब्रँडेड कंपनीच्या सॅकदेखील आहेत. खास चिमुकल्यांसाठी तयार केलेल्या कार्टून शेप सॅक बाजारात ग्राहकांना आकर्षित करत आहेत.

यंदा दरात 40 टक्के वाढ
‘छोटा भीम’, ‘डोरेमॉन’, ‘मिकीमाउस’, ‘टॉम अँड जेरी’, ‘बार्बी’, ‘बेनटेन’ या कार्टूनची आकर्षक दप्तरे बाजारात दाखल झाली आहेत. ही दप्तरे वजनाला हलकी आणि मजबूत अशी आहेत. मे महिना संपत आल्याने पालकांना शालेय साहित्य खरेदीचे वेध लागले आहेत. कार्टूनचा प्रभाव इतका आहे, की बाजारात दप्तरे सुद्धा कार्टूनमय बनवली आहेत. त्याला मागणीही चांगली आहे. बार्बी ते छोटा भीम असणा-या दफ्तरांच्या किंमती 200 ते 1600 पर्यंत असून यामध्ये 30 ते 40 टक्के वाढ झाली असून जीएसटी परिणाम असल्याचे पिंपरीतील होलसेल विक्रेते कमलेश कृपलानी यांनी सांगितले.

‘टेडी सॅक’ यंदाचे वैशिष्ट्य
लहान मुलांसाठी टॉईजचा वापर करून विशिष्ट कार्टूनच्या आकाराची तयार केलेली छोटीशी ‘टेडी सॅक’ यंदाचे वैशिष्ट्य आहे. ही सॅक वजनाला हलकी आणि मजबूत असल्यामुळे दप्तराचे ओझे होणार नाही, अशी आहे. त्यामुळे या सॅकला ग्राहकांकडून चांगली पसंती मिळत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.