शालेय शुल्कवाढीला अंकुश लावण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करणार

0

पुणे : राज्यातील शालेय शुल्कवाढीवर कारवाई करण्याबाबत पूर्वीच्या सरकारने केलेल्या कायद्यात अनेक त्रुटी आहेत. शाळांच्या शुल्कवाढीस अंकुश लावण्यासाठी आमचे सरकार या कायद्यात दुरुस्ती करणार आहे. पालकांच्या हितालाच आम्ही प्राधान्य् देऊ, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले.

येथे एका कार्यक्रमानंतर तावडे पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील शाळांच्या मनमानी शुल्कवाढीसंदर्भात अनेक पालकांनी शैक्षणिक मंडळाकडे तक्रारी केल्या आहेत. अनेक शाळा पुस्तके, गणवेश, शालेय वस्तू शाळांमधूनच घेण्याची सक्ती करतात. या शाळांविरोधात ठोस पुरावेही पालकांकडे आहेत. शुल्कवाढी विरोधात पालक आंदोलन करत आहेत. या कार्यक्रमानंतरही अनेक पालकांनी तावडे यांना घेराओ घालून याबाबतची तीव्र नाराजी व्यक्त केली.

काही शाळा व संस्थांची चौकशी सुरू
तावडे म्हणाले, अनेक शाळांच्या तक्रारी आलेल्या असून, या संदर्भात पुरावेही मिळाले आहेत. मात्र, सध्याचे शैक्षणिक कायदे संस्थांवर कारवाई करण्यासाठी पुरेसे नाहीत. सध्या तक्रार आलेल्या प्रत्येक संस्थेची जी सुनावणी सुरु आहे, त्यात यश येत आहे. पण अशा संस्थांची संख्या वाढली, तर त्यासाठी सक्षम कायदाच असावा लागेल. त्यामुळे सध्याच्या कायद्यात दुरुस्ती करुन अधिक कडक कायदा करण्यात येईल. त्यानंतर शाळा व संस्थांवर कारवाई करण्यात येईल.

कारवाई नसल्याने पालकांत रोष
राज्यातील अठरा शाळांमधील पालक आंदोलन करत आहेत. तावडे पुण्यातील कार्यक्रमात येणार असल्याने पालकांनी कार्यक्रमस्थळी धाव घेतली. अनेक पालक सोलापूर, कोल्हापूर, ठाणे अशा विविध ठिकाणांवरुन आले होते. मनमानी शुल्कवाढ करणार्‍या शाळा व संस्थांवर कारवाईचे आश्‍वासन तावडे यांनी 30 जुलै रोजी विधिमंडळात दिले होते. तसेच, अशा संस्थांवर कारवाई करू, असेही तावडे यांनी पालकांना सांगितले होते. मात्र, अशा संस्था किंवा शाळांवर प्रत्यक्षात कारवाई होत नाही, अशी तीव्र नाराजी अनेक पालकांनी तावडे यांच्याकडे केली. यावेळी पालकांच्या भावना तीव्र होत्या. पालकांच्या या रोषाला तावडे यांना सामोरे जावे लागले.

पालकांवरही आत्महत्येची वेळ
पालकांच्या प्रश्‍नाकडे शिक्षणमंत्री दुर्लक्ष करतात. आश्‍वासनांशिवाय शिक्षणमंत्री काहीच करत नसून, आधी शेतकरी आत्महत्या करत होते आता पालकांवरही आत्महत्या करण्याची वेळ सरकारने आणली आहे.
हेमलता शिंदे (ठाणे, पालक)