शाळांचा दर्जा व गुणवत्ता सुधारणेकामी प्रयत्नशील रहा; मुख्याध्यापकांना आवाहन

0
शाळा स्मार्ट करण्यासाठी प्रयत्नशील
महापौर राहुल जाधव यांचे आश्‍वासन
पिंपरी चिंचवड : शहरातील शैक्षणिक गुणवत्ता व दर्जा सुधारण्याचे स्वप्न आहे. ते आपल्या सहकार्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न करु. पिंपरी चिंचवड शहराचे नाव शैक्षणिक क्षेत्रात उज्वल होणे गरजेचे असून शहरातील सर्व शाळा आयएसओ आणि स्मार्ट होणे आवश्यक आहे. त्यासाठी हवे ते प्रयत्न करण्यात येतील, असा विश्‍वास महापौर राहुल जाधव यांनी मुख्याध्यापकांच्या सभेत व्यक्त केला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व शाळांना महापौर यांनी भेटी दिल्या होत्या. सदर भेटीच्या अनुषंगाने शहरातील शाळांचा दर्जा व गुणवत्ता सुधारणेकामी प्रयत्न करण्यासाठी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची सभा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी महापौर बोलत होते.
सर्व शाळा स्मार्ट करणार…
ज्या शिक्षकांना, शाळांना काही अडचणी, समस्या असतील तर त्या शिक्षण समितीच्या सभापतीकडे मांडाव्यात. त्यावर निश्‍चितच उपाय योजना करण्यात येतील. समस्या असल्या तरी जबाबदारी टाळणे योग्य नाही. सर्व शाळा स्मार्ट करणार आहे. शिक्षकांनीही स्मार्ट व्हावे. शिक्षकांना 25-30 वर्षाचा अनुभव आहे, त्याचा उपयोग विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी करावा. आजचे विद्यार्थी हे शहरातील उद्याचे भविष्य आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी चांगले निर्णय घेऊ. यापूढे शाळांना अचानक भेटी देण्यात येतील. सर्व विद्यार्थी हे शाळेत टापटीपपणे येतील याकडे लक्ष द्यावे. शाळेमध्ये स्वच्छता ठवणे शिक्षकांची जबाबदारी आहे. शाळांसाठी आवश्यक ती सर्व सुविधा पुरविण्यासाठी अंदाजपत्रकात तरतुदी करण्यात येतील. परंतू शाळांचा दर्जा व गुणवत्तेत सुधारणा न झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असे ठणकावत सर्व शिक्षकांचा मेळावा येत्या 15 दिवसात आयोजित करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
मुख्यापकांना पुस्तकांचे वाटप…
दरम्यान, शिक्षण समितीच्या सभापती सोनाली गव्हाणे यांनी आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवशी त्यांची पुस्तक तुला केली होती. त्या सर्व पुस्तकांचे वाटप महापौर यांचे हस्ते मुख्याध्यापकांना करण्यात आले. शेवटी महापौर यांनी शहरातील प्रत्येक विद्यार्थ्याला रुबेला, गोवर लस देण्यासाठी प्रयत्न करणे व जनजागृती करण्याचे आवाहन केले. प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी प्रास्ताविक केले.
रुबेला, गोवर लस देण्याचे आवाहन…
यावेळी, शिक्षण समितीच्या सभापती सोनाली गव्हाणे, नगरसदस्या संगिता भोंडवे, प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे, प्रा. शिक्षणाधिकारी पराग मुंढे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, डॉ. वर्षा डांगे उपस्थित होते. डॉ. पवन साळवे यांनी शहरातील प्रत्येक विद्यार्थ्याला रुबेला, गोवर लस देण्यासाठी प्रयत्न करणे व जनजागृती करण्याची विनंती केली. तसेच, डॉ. डांगे यांनी 19 वर्षाखालील विद्यार्थ्यांना दर सोमवारी- गुरूवारी लोह गोळी देण्याचे आवाहन केले.