भुसावळ। सध्या शिक्षणक्षेत्रात आमुलाग्र बदल होत आहेत. शिकणे आणि शिकवण्याच्या पद्धतींमध्ये नवनवीन बाबी समाविष्ट होत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेत वाढ होवू लागली आहे. ही गुणवत्ता वाढवून टिकवून ठेवण्यासाठी शिक्षकांनी नाविन्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबविले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील यांनी येथे केले.
यांनी केले मार्गदर्शन
सेंट अलॉयसियस स्कूलमध्ये पार पडलेल्या शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर गटशिक्षणाधिकारी विजय पवार, शालेय पोषण आहार अधिक्षक सुमित्र अहिरे, शिक्षण विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण, प्रतिमा सानप यांची उपस्थिती होती. प्रारंभी गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी नवीन शैक्षणिक वर्षात राबवायच्या विविध कार्यक्रमांबाबत माहिती दिली. त्यानंतर शालेय पोषण आहार अधिक्षक सुमित्र अहिरे यांनी सुटीदरम्यान आलेल्या तसेच गेल्या शैक्षणिक वर्षातील विविध शासन निर्णयांचा आढावा घेतला.
पुस्तकांचे वितरण पहिल्याच दिवशी करा
शाळा प्रवेशोत्सव, शाळासिद्धी, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, पायाभूत व संकलित चाचण्या, नैदानिक चाचण्या याविषयी सविस्तर माहिती दिली. ज्या शाळांमध्ये बचत गटांकडून पोषण आहार शिजविला जातो अशा सतरा शाळांनी त्यामोबदल्यात संबंधित बचत गटांना दिलेल्या धनादेशाचा तपशील एका दिवसात सादर करण्याच्या सक्त सूचनाही अहिरे यांनी दिल्या. गुणवत्तापूर्ण शिक्षण बालकाला मिळाले पाहिजे या उद्देशाने शाळेचा पहिला दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करावा. शाळा सजल्या पाहिजेत. शाळेची सुरूवात उत्साहवर्धक झाल्यास त्याच्या गुणवत्तापूर्ण शिक्षकाची एक चांगली सुरूवात होवू शकणार आहे. फुले देवून विद्यार्थ्यांचे स्वागत करावे. मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरणही पहिल्याच दिवशी करावे. शाळा प्रवेशोत्सवासाठी किमान एक तासाचा कालावधी देवून त्यानंतर शालेय कामकाजास सुरूवात करावी, अशा सूचनाही यावेळी करण्यात आल्या.
मुख्याध्यापकांची होती उपस्थिती
सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन शिक्षण विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण यांनी केले. आढावा बैठकीला भुसावळ शहरासह तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, सर्व माध्यमांच्या खाजगी, अनुदानित, विनाअनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.