जळगाव। स्थानिक स्वराज्य संस्थेंतर्गत येणार्या शासकीय शाळेतील विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत गणवेशाचे वाटप केले जाते. यावर्षापासून गणवेश न देता संबंधीत विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात गणवेशाची रक्कम जमा करण्यात येणार आहे. 1 ली ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना गणवेश दिले जाते. जिल्ह्यातील 1 हजार 892 शाळांना 6 कोटी 38 लाख 47 हजार सहाशे रुपयाचा निधी वितरणीत केला जाणार आहे.
पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश
जिल्ह्याभरातील सर्व मुली व अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती प्रवर्गातील मुलांना गणवेशाची रक्कम देण्यात येणार आहे. जिल्ह्यात एकुण लाभार्थ्यांची संख्या 1 लाख 59 हजार 612 इतकी आहे. जिल्हास्तरावरुन प्रत्येक शाळांच्या खात्यात रक्कम पाठविली जाणार असून शाळेमार्फत विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे. विद्यार्थी व आईच्या नावाचे आधारकार्ड संलग्न होईल अशा बँकेत संयुक्त खाते उघडावयाचे आहे. पोस्टाच्या बचत खात्यात देखील रक्कम जमा करण्यात येणार आहे. पालकांना शाळा सुरु होण्या अगोदर स्वःखर्चाने दोन गणवेश खरेदी करावयाचे असून खरेदीचे बिल मुख्याध्यापकांकडे जमा केल्यानंतर शाळा लाभार्थी विद्यार्थ्यांच्या खात्यावर दोन गणवेशाचे चारशे रुपये रक्कम जमा करणार आहे. शाळांचा खात्यात रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरु असून येत्या आठवड्याभरात रक्कम जमा होणार आहे.