शालेय गणवेशासाठी पालकांना बसला आर्थिक भुर्दंड
भुसावळ- महाराष्ट्र शिक्षण परीषदेने समग्र शिक्षा अभियानातंर्गत विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वितरण केले जात आहे मात्र तालुकास्तरावरून वितरीत केला जाणार्या मोफत शालेय गणवेशात घोटाळा उघडकीस आल्याने शिक्षण विभागाने दोन वर्षांपासून शालेय गणवेशाचा निधी विद्याथ्यार्र्ंच्या पालकांच्या खात्यावर वर्ग करण्यास सुरूवात केली होती. यासाठी पालकांना राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडण्याचे बंधनकारक केले होते शिवाय शालेय गणवेश खरेदी केल्याची पावती शालेय स्तरावर दिल्यावरच निधी बँकेत वर्ग केला जात होता. यासाठी पालकांना अडचणीचा सामना करावा लागला मात्र प्रक्रिया किचकट असल्याचे शिक्षण परीषदेच्या लक्षात आल्याने त्यांनी थेट लाभ हस्तातंरणाची अट शिथील करून सन-2018/19 या शैक्षणिक वर्षापासून पुन्हा मागील प्रमाणेच शाळा व्यवस्थापनाच्या माध्यमातूनच शालेय गणवेश खरेदी करून वितरीत करण्याचे आदेश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक परीषदेचे राज्य प्रकल्प संचालक तथा आयुक्त विशाल सोळंकी, मुंबई यांनी शिक्षण विभागाला दिले आहेत.
अशा विद्यार्थ्यांना मिळणार शालेय गणवेशाचा लाभ
समग्र शिक्षा अभियानातंर्गत मोफत शालेय गणवेश योजना ही शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गातील सर्व मुले, मुली, अनुसूचित जमाती मुले तसेच दारीद्रय रेषेखालील पालकांची मूले अशा एकूण 36 लाख 23 हजार 881 गणवेश पात्र विद्यार्थांना लाभ दिला जाणार आहे.
सहाशे रूपयाची तरतूद मंजूर
समग्र शिक्षा अभियानातंर्गत शालेय गणवेशासाठी राज्यभरातील 36 लाख 23 हजार 881 विद्यार्थ्यांसाठी 2174329 लाखाची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये लाभार्थी विद्यार्थ्यांना प्रति गणवेश 300 रूपये दराने दोन गणवेशासाठी 600 रूपये मंजूर करण्यात आले आहेत. गणवेश योजनेची मंजूर तरतूद केंद्र, तालुका आणि जिल्हास्तरावरून खर्च न करता शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरून समितीच्या मान्यतेने खर्च करण्याचेही आदेशात नमूद केले आहे.
निधी लवकर वर्ग करण्याची सुचना
वरीष्ठ स्तरावर झालेल्या बैठकीत तूर्त एक वर्षाच्या कालावधीकरीता मोफत शालेय गणवेशाचा निधी शाळा व्यवस्थापन समितीकडे वर्ग करण्यास व शालेय गणवेश खरेदी करण्यास मुख्य सचिवांनी मान्यता दिली आहे मात्र गणवेश खरेदीच्या सुचना यथावकाश देण्यात येतील, असेही कळवले आहे. त्यामुळे समग्र शिक्षा अभियानातंर्गत गणवेश योजनेचा मंजूर निधी संबधीत शाळा व्यवस्थापनाकडे सात दिवसाच्या आत वर्ग करण्याचीही सुचना देण्यात आली असून इयत्ता पहीलीच्या लाभार्थी विद्यार्थ्यांसाठी व नव्याने प्रवेश घेतलेल्या निकषपात्र विद्यार्थ्यांना तात्काळ गणवेश वाटप करण्याची दक्षता घेण्याचे सुचित करण्यात आले आहे.
पालकांना आर्थिक भुर्दंड
शिक्षण विभागाच्या मागील निर्णयानुसार शालेय गणवेशाचा मंजूर निधी आपल्या खात्यात जमा होईल या द्दृष्टीने बहुतांश पालकांनी शाळा सुरू होताच आपल्या पाल्यांसाठी शालेय गणवेशाची खरेदी करून बिले घेतली आहेत मात्र शासनाच्या नवीन निर्णयानुसार शाळा व्यवस्थापन समितीकडून शालेय गणवेशाचे वितरण होणार असल्याने पालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे तसेच शाळा व्यवस्थापन समितीकडून वितरीत होणार्या शालेय गणवेशाचा घोळ निर्माण होण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.