पिंपरी-चिंचवड :- येथील प्रेमलोक पार्कमधील महात्मा फुले शाळेचे स्थलांतर पूर्ण झाले असून दळवीनगर परिसरातील नवीन जागेमध्ये सोमवारपासून शाळा नियमित सुरू झाली आहे. परंतु, शाळा स्थलांतराला विरोध करत विद्यार्थ्यांनी आज (बुधवारी) पालिकेवर धडक दिली. पालिका मुख्यालयासमोर विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गाऊन ठिय्या मांडला आहे. तर महात्मा फुले शाळेची इमारती नियोजित पोलीस आयुक्तलयासाठी भाड्याने देण्यात आली आहे.
यांनी घेतला आंदोलनात सहभाग
विद्यार्थ्यांना विरोधकांनी पाठिंबा दिला आहे. विरोधी पक्षनेते दत्ता साने, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेविका शितल काटे, उषा वाघेरे, विनया तापकीर, संगीता ताम्हाणे, डॉ. वैशाली घोडेकर, नगरसेवक नाना काटे, मोरेश्वर भोंडवे, जावेद शेख, पंकज भालेकर, प्रवीण भालेकर यांच्यासह छावा क्रांतीवीर सेनेचे राजेंद्र पडवळ, विजय जरे, शीतल हुलवळे आंदोलनात सहभागी झाले आहेत.
शाळा स्थलांतरीत करून इमारत आयुक्तालयासाठी भाडेतत्वावर
प्रेमलोक पार्क येथील महापालिकेची महात्मा फुले शाळा स्थलांतरीत करून ही इमारत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी भाडेतत्वावर देण्यात आली आहे. शाळेतील साहित्य देखील हलविण्यात आले आहे. परंतु, याला विद्यार्थ्यांचा विरोध आहे. या निर्णयाला विरोध करत विद्यार्थी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. परंतु, त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत सत्ताधारी आणि प्रशासनाने ही शाळा दळवीनगर परिसरात स्थलांतरित केली आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांना दळवीनगर येथील रेल्वे लाईनला लागून असलेल्या इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. हे अत्यंत चुकीचे असून येथे दिवसभर रेल्वेच्या आवाजाचा ‘खडखडाट’ सुरु असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शाळेत लक्ष लागणार नाही, असे पालकांचे मत आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तलयासाठी सरकारने विद्यार्थ्यांना वा-यावर सोडू नये. महात्मा फुले शाळेत वर्ग सुरू ठेवावेत, अशी आग्रही मागणी पालकांची आहे. त्यासाठी पालकांनी विविध मार्गांनी आंदोलनही केले आहे.