शाळा ही मन घडविणारी फक्टरीच : प्रा. तोडमल

0

नवनगर शिक्षण मंडळाकडून शिक्षक कार्यशाळा

निगडी : विद्यार्थी घडविण्यासाठी परिणामदायी शिक्षण देणारे शिक्षक असतात. शिक्षक आणि शाळा ही मन घडविणारी फॅक्टरीच असते. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी उपक्रमशिलता, अभ्यासू वृत्ती, प्रयोगशिलता, सकारात्मकता, नैतिकता, वाचनशिलता, आचरणशुद्धता या गुणांचे बाळकडू विद्यार्थ्यांना देत चौकटी बाहेरचे आनंददायी, उपजिविकेचे, व्यवहार ज्ञानाचे व जीवन जगण्याचे तंत्र देणारे शिक्षण शिक्षकच देऊ शकतात, असे प्रतिपादन आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. वर्षा तोडमल यांनी केले. नवनगर शिक्षण मंडळाच्या श्री सरस्वती विद्यालयात दक्षता समितीच्यावतीने आयोजित शिक्षक कार्यशाळेत त्या बोलत होत्या.

सत्कृत्याचे संस्कार करावे
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. तोडमल म्हणाल्या की, शिक्षकांमध्ये पालक व शिक्षक या दुहेरी भुमिकेतून आदर्श व सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडविण्याचे सामर्थ्य असते. दोषांचे निराकरण करून संस्कार केल्यास सामर्थ्यशाली राष्ट्र शिक्षक घडवू शकतात. यासाठी विविध खेळ, गोष्टी, कथा, व्यायाम, अनुभव, युक्त्या सांगत सत्कृत्याचे संस्कार करावेत. अशाने विचार सुधारतील, विचारातून आचरण, आचरणातून व्यक्तिमत्व सुधारेल व त्यातून जीवन बदलेल.

यावेळी नवनगर शिक्षण मंडळाचे संस्थापक-सचिव प्रा. गोविंदराव दाभाडे, संचालिका डॉ. अश्‍विनी दाभाडे, प्राचार्या साधना दातीर, मनःशक्ती केंद्राचे साधक अनुजा चंदने, छाया शिंदे, चंदने सर, पर्यवेक्षिका सुरेखा आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक सुनीता चौधरी यांनी केले. तर पाहुण्यांचा परिचय व आभार रेश्मा बनसोडे यांनी मानले.