शाळेत सीसीटीव्ही बसवा

0

वाल्हे । पुरंदर तालुक्यातील मोठ्या शाळेत गणल्या जाणार्‍या महर्षी वाल्मिकी विद्यालयात शेकडो विद्यार्थिनी शिक्षण घेत असताना या मुलींच्या सुरक्षितेसाठी सीसीटीव्ही आणि गुपित तक्रार टपाल पेटी नसल्याची बाब उघड झाली आहे. तात्काळ सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना निर्भया पथकाने शाळेला दिल्या आहेत.

वाल्हे येथे भोर विभाग सासवड व जेजुरी पोलिसांच्या वतीने निर्भया पथकाच्या महिला पोलिस कॉस्टेबल कांचन अडसुळ व हेमलता भुजबळ यांनी भेट दिली. निर्भया पथकाच्या वतीने मुलींना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन ही करण्यात आले. यावेळी वाल्हे पोलिस ठाण्याचे संदीप पवार यांच्यासह महिला शिक्षिका ही उपस्थित होत्या. मुलींनी स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, प्रत्येकवेळी आपल्या पाल्याला अथवा विद्यालयातील महिला शिक्षकांशी काही तक्रार असल्यास भेटून ती बोलून दाखवावी, कोणी त्रास देत असेल तर त्या मुलाचे नाव तक्रार पेटीत पत्र टाकून कळवावे, वाडी वस्त्यावरील मुलींनी शाळेत येताना व जाताना ग्रुपनेच जाणे-येणे गरजेचे आहे, विद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपण ग्रामीण भागात राहातो, शहरी पद्वतीचे राहणीमान टाळावे, अंग झाकेल असे पुरेसे कपडे घालणे गरजेचे आहे. अशा सूचना मुलींना देण्यात आल्या. विद्यालयाच्या व्यवस्थापनास ओळखपत्र, सीसीटीव्ही, गेटमन व बाहेरून विद्यालयात येणार्‍या जाणार्‍या व्यक्तींच्या नोंदी ठेवणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. तर तात्काळ सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना केल्या. तर निर्भया पथकाचे हेल्पलाईन व व्हॉट्सअ‍ॅप नंबर मुलींना देण्यात आला.