शासकीय कामात अडथळा आणल्याचे प्रकरण भोवले

0

पाचोरा पंचायत समिती गोंधळ; सावखेड्याच्या उपसरपंचाविरुद्ध गुन्हा
पाचोरा – अनुदानाच्या चेक संदर्भात पत्रकारासमक्ष सावखेडा बु गावच्या ग्रामसेवकाची चौकशी सुरू असताना तावातावाने आलेल्या उपसरपंचाने कामात व्यत्यय आणून पंचायत समितीत सभापती दालनात गोंधळ घातल्याप्रकरणी गट विकास अधिकारी गणेश चौधरी यांच्या फिर्यादीवरून सावखेडा बुचे उपसरपंचाविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलीस सूत्रा कडून प्राप्त माहिती अशी की, आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास पाचोरा प समिती सभापती बन्सीलाल पाटील यांच्या दालनात सावखेडा बु येथील रहिवासी व भारतीय सैन्यातीळ जवान दीपक वाघ यांच्या आईच्या नावे मंजूर असलेल्या रोजगार हमीच्या विहीर अनुदान चेक संदर्भात ग्रामसेवक शिवदास बुधा गव्हाळे यांनी जवानाकडे ५ हजाराची लाच मागितली. तसेच सदर गावच्या प्रकाश मोची यांचे घरकूल संदर्भातील तक्रारीचीही चौकशी गटविकास अधिकारी गणेश चौधरी हे पत्रकारांसमक्ष करीत होते. यावेळी ग्रामसेवक दोषी आढळत असताना बाहेर उभे असलेले सावखेडा बुचे उपसरपंच कैलास अभिमन तांबे हे सभापतींचे दालनाचा दरवाजा ताडकन ढकलून चौकशीचे शासकीय कामकाज चालू असताना मध्येच व्यत्यय आणीत अर्वाच्य भाषेत बोलून तांबे याने गोंधळ घातला. यावेळी तेथे उपस्थित एका वाहिनीचे पत्रकार अपंग दिलीप जैन यांना कैलास तांबे याने धमकावत शासकीय कामात अडथळा आणला. याघटनेनुसार गटविकास अधिकारी चौधरी यानी फिर्याद दिल्यावरून पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.