शहादा- जिल्ह्यातील विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरांसह व्हाईस रेकॉर्डर बसविण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबत मनसेचे जिल्हा सचिव मनलेश जायसवाल यांच्या स्वाक्षरीने जिल्हाधिकार्यांना देण्यात आलेल्या निवेदनाचा आशय असा, नंदुरबार जिल्हा आदिवासी बहुल म्हणून परिचित आहे. जिल्ह्यातील दुर्गम अतिदुर्गम भागासह सपाटीवरील तालुक्यात आजही समस्या कायम आहेत. समस्या सुटाव्यात यासाठी सर्वसामान्य जनतेच्यावतीने लोकप्रतिनिधींना शासकीय – निमशासकीय कार्यालयात जावे लागते. अनेकदा संबंधीत अधिकारी जागेवर सापडत नाही. परिणामी, समस्या जैसे थे राहतात. समस्या सुटाव्यात यासाठी जनआंदोलन करावे लागते.
जनआंदोलनाच्यावेळी कायदेशीर दृष्टया काळजी घेवूनही काही अधिकार्यांच्या मनमानीमुळे आंदोलन चिघळते. यातून आंदोलकांवर शासकीय कार्यात अडथळा आणण्यासह विविध कलमान्वये खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जाते. नैसर्गिक न्याय तत्त्वानूसार आंदोलन व अधिकार्यांची भुमिका पुरावा म्हणून समोर यावी यासाठी जिल्ह्यातील शासकीय निमशासकीय कार्यालय व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरासह व्हाईस रेकॉर्डर शासकीय निधीतून त्वरीत बसविण्यात यावेत. निवेदनाच्या प्रती राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षनेते, जिल्हा पोलिस प्रमुख आदिंना देण्यात आल्या आहेत.