शासकीय तूर खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी

0

रावेर । शेतकर्‍यांकडून तुरीचे उत्पादन येण्यास सुरुवात झाली असून अद्यापी शासनाने तूर खरेदी केंद्र सुरु केलेले नाही. त्यामुळे अल्पशा भावात तुरी शेतकर्‍यांना खासगी व्यापार्‍यांना विकावे लागत असल्याने लवकरात लवकर तूर खरेदी केंद्र सुरु करावे, अशा आशयाचे पत्र कृषी उत्पन्न बाजार समितीने तहसिलदारांकडे केले आहे.

कवडीमोल भावात करावी लागते विक्री
मार्केट यार्डात तुरी विक्रीस येण्यास सुरुवात झालेली असून शासनाचा भाव प्रती क्विंटल 5 हजार 50 आहे. परंतु खरेदी केंद्र सुरु नसल्याने शेतकर्‍यांना खाजगी व्यापार्‍यांना तीन हजार ते 3 हजार 800 रुपयांच्या भावाने विकावे लागत आहेे. ज्वारी, मका खरेदी केंद्राचे उद्घाटन महिनाभरापूर्वी झाले होते. परंतु अद्यापी एक दाणा सुध्दा खरेदी झालेला नाही. शासनातर्फे साठवणुकीसाठी तालुका प्रशासनाला गोडाऊनच उपलब्ध करण्यास अपयश आले आहे. त्यामुळे शेेतकर्‍यांना कवडीमोल भावात ज्वारी, मका खाजगी व्यापार्‍यांना विकावे लागते.

तहसिलदारांकडे तूर खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी मागणी केली आहे. हिवाळा चांगला असल्याने तुरीची लागवड जास्त असून उत्पादनाचा विचार करुन शासनातर्फे खरेदी केंद्र सुरु करावे ज्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होणार नाही तसेच ज्वारी व मका साठवण्यासाठी तहसिल प्रशासनाने गोडाऊन उपलब्ध करुन द्यावे ज्यामुळे शेतकर्‍याकडून खरेदी करणे सोयीचे होईल. – प्रमोद धनके, उपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, रावेर