शासकीय दाखल्यांच्या प्रश्‍नात खा. शिरोळे घालणार लक्ष

0

पुणे । शासकीय दाखले मिळतच नसल्याने अनेक गरजुंचे प्रस्ताव अडकून पडले आहेत. या प्रश्‍नात लक्ष घालण्याचे खासदार अनिल शिरोळे यांनी ठरविले आहे. संजय गांधी अनुदान योजना असो वा अन्य यात सरकार दरबारी प्रस्ताव दाखल करण्यासाठी उत्पन्नाचा, रहिवासी दाखला आदी दाखले अर्जासोबत जोडावे लागतात. गेले महिना दोन महिने झाले तलाठी दाखलेच देत नाहीत.

राज्य सरकारने दाखले देण्याचे तलाठ्यांचे अधिकार काढून घेतले आहेत असे मामलेदार कचेरीतून सांगण्यात येते. यावर पर्याय काय असे विचारल्यावर जिल्हाधिकारी राव यांच्याकडे बोट दाखविले जाते. राव यांनी पुढील सूचना देईपर्यंत आम्ही काही करू शकत नाही, असे सांगितले जाते. यामुळे शेकडो प्रकरणे पडून आहेत. जनशक्तिने या प्रश्‍नाला पहिली वाचा फोडली. त्याचप्रमाणे प्रहार संघटनेने राव यांना निवेदनही दिले. या प्रश्‍नाकडे खासदार शिरोळे यांचे लक्ष वेधले असता त्यांनी तात्काळ प्रतिसाद दिला आणि हा प्रश्‍न सुटेपर्यंत पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन जनशक्तिशी बोलताना दिले.