शासनाकडून न्याय न मिळाल्यास याचिका दाखल करु!

0

जळगाव । जामनेर तालुक्यातील वाकडी गावात मातंग समाजाच्या मुलांना विहिरीत पोहण्यावरुन मारहाण करणार्‍यांवर कारवाई करतांना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली आहे़ धनदांडग्यांपुढे नांग्या टाकण्याचे काम पोलिसांनी केले आहे़ शासनाकडून पिडितांना न्याय मिळाला नाही तर, न्यायालयात याचिका दाखल करु, असा इशारा बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी जिल्हा पत्रकार संघात घेतलेल्रा पत्रपरिषदेत दिला़ सिाहेबराव शुंगार, प्रदेशाध्यक्ष राजीव आवळे, प्रदेश उपाध्यक्ष सूर्यकांत भालेराव, मोहन चव्हाण, संपर्कप्रमुख रवींद्र पाटील, प्रदेश चिटणीस रविंद्र वाकळे, रमेश कांबळे, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश बोरसे, जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्‍वर सुरवाडे, अनिल साठे, तात्या खरात, रवींद्र बाविस्कर, गुलाब बाविस्कर आदी उपस्थित होते़

विहीरींची केली पाहणी: आम्ही गावात जाऊन दोन्ही विहिरींची पाहणी केली़ यात सत्तर फुट विहिरीत मुले पोहत असल्याचे पोलिसांकडून दर्शविण्यात आले आहे़ परंतु प्रत्यक्षात मात्र दुसर्‍याच विहिरीत मुले पोहत असल्याचे समजले व ती विहीर फक्त सतरा फुट खोल असल्याचे सांगत पोलिसांनी या प्रकरणात बघ्याची भूमिका घेत गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ केली़ मात्र, तरुणांनी पुढाकार घेतल्यामुळे गुन्हा दाखल करावा लागला़ धनदांडग्या व संपत्तीचा माज आलेल्या पुढे पोलिसांनी नांग्या टाकल्या असून याप्रकरणात कलम 4 प्रमाणे आयओंवरच कारवाई करण्याची मागणी प्रा. ढोबळे यांनी केली आहे. अत्याचारांच्या घटनांमध्ये पोलीस कारवाई करीत नाही, वाकडी गावाच्या घटनेबाबत पोलीस गंभीर नाहीत, अशा घटनामध्ये पोलीस कारवाई करत नसतील तर गावागावात तरुणांचे संघटन वाढत आहे व पुढे हेच तरुण अन्याय करणार्‍यांना त्यांच्या पद्धतीने धडा शिकवतील, असा इशाराही यावेळी प्रा. ढोबळे यांनी दिला. दरम्यान, या घटनेतील शेत मालकाकडे 200 एकर जमीन आहे, एवढी जमीन यांच्याकडे कशी आली, याची चौकशी व्हावी, अशी मागणी देखील आम्ही केली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गावात मागासवर्गीय समाजासाठी कोणत्याही योजना आलेल्या नाहीत़ त्यामुळे गावात मागासवर्गीयांसाठी असलेल्या योजना राबविण्याकरीता पत्र देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले़