जळगाव । शासन जनतेसाठी अनेक लोकोपयोगी योजना राबवित आहे. या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवून त्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सामाजिक न्याय विभाग व विविध विकास महामंडळांनी स्वत:हून प्रयत्न करण्याच्या सूचना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिल्या. शहरातील अजिंठा शासकीय विश्रामगृहात राज्यमंत्री कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक न्याय विभाग व विविध विकास महामंडळाच्या अधिकार्यांची आढावा बैठक संपन्न झाली, यावेळी ते बोलत हाते. या बैठकीस माजी आमदार गुरुमुख जगवाणी, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त खुशाल गायकवाड, वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एच. जी. आत्राम, इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ आणि अपंग वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस. जी. तायडे, साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक टी. व्ही. कसबे, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे प्रतिनिधी निरंजन सावळे, आर. डी. पवार आदि उपस्थित होते.
कर्जाचे वाटप होणे आवश्यक
यावेळी पुढे बोलतांना कांबळे म्हणाले की, शासन विविध विकास महामंडळांच्या मार्फत छोटया व्यावसायिकांसाठी आर्थिक मदतीच्या योजना राबवित आहे. या योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तसेच या योजनांच्या त्यांना लाभ होण्यसाठी संबंधित अधिकार्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. बेरोजगारांना स्वयंरोजगारासाठी महामंडळाच्या माध्यमातून मोठया प्रमाणात कर्जाचे वाटप होणे आवश्यक आहे. जेणेकरुन त्यांना स्वयंरोजगार करुन आपली उपजिविका करणे शक्य होणार आहे.यानंतर राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी कामकाजाचा आढाव घेत सुरू असलेल्या कामांची तसेच योजनाची माहिती अधिकार्यांकडून जाणून घेतली. यावेळी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, त्यांनी अधिकार्यांना सुचना देखील केल्या आहेत.
योजनांचा घेतला आढावा
राज्यमंत्री कांबळे यांनी जिल्हयातील विद्यार्थ्यी शिष्यवृत्तीची प्रलंबित प्रकरणे, वसतीगृह प्रवेश प्रक्रिया त्याचबरोबर विविध विकास महामंडळामार्फत देण्यात येणार्या लाभाच्या योजनांचा आढावा घेतला. या आढाव्यात जिल्हयात मुलांचे 7 तर मुलींचे 5 वसतीगृह असून यामध्ये 835 विद्यार्थ्याची क्षमता असून 595 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. तर काही कोर्सेसचे प्रवेश अद्याप पूर्ण झाले नसल्याने उर्वरित प्रवेश देण्याची कार्यवाही सुरु आहे. शिष्यवृत्तीच्या प्रलंबित प्रकरणासाठी निधी उपलब्ध झाला असून त्याचे लवकरच वाटप करण्यात येणार असल्याचे सहायक आयुक्त खुशाल गायकवाड यांनी बैठकीत दिली.
अशा केल्या सुचना
समाजाकल्याण विभागानेही विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध शिष्यवृत्तीच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महाविद्यालयामार्फत जनजागृती करुन सहभागी करुन घेणे, वसतीगृहातील विद्यार्थ्यांना चांगले भोजन उपलब्ध करुन देणे, त्यांची राहण्याची व्यवस्था चांगली ठेवण्याबाबत काळजी घेणे, महिला वसतीगृहासाठी महिला अधिक्षकांची नेमणूक करणे, महामंडळाचे थकीत कर्ज वसुलीसाठी उपाययोजना राबविणे आदि बाबत सूचनाही त्यांनी संबंधित अधिकार्यांना दिल्या. तसेच विविध विकास महामंडळाकडे बीज भांडवल योजनेतंर्गत प्राप्त झालेल्या कर्ज मागणी अर्जांची तपासणी करुन ते तातडीने बॅकाकडे पाठविण्याच्या सुचनाही त्यांनी महामंडळाच्या प्रतिनिधींना दिल्यात.