माजी आमदार शिरीष चौधरी ; यावलला 11 गावातील कामांबाबत नियोजन प्रशिक्षण
यावल- सातपुड्यातील तलावात मोठ्या प्रमाणावर गाळ साचला असून एकीकडे शासन तलावातील गाळ काढावयास हवा, असे सांगत असून दुसरीकडे वनविभाग गाळ काढ देत नाही, असे चित्र असल्याने शासनाच्या दोन विभागात समन्वयाच्या अभावामुळे अडचण निर्माण झाली आहे. गाळ काढल्यास म्हणते वन्यप्राण्यांच्या जीवास धोका निर्माण होईल, अशी वनविभागाची भूमिका असलीतरी इथे माणसांवर मरण्याची वेळ आली आहे. तेव्हा शासनाला याची जाणीव झाली पाहिजे, असे प्रतिपादन माजी आमदार शिरीष चौधरी यांनी केले. बुधवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात तालुक्यातून जलयुक्त शिवाराकरीता निवड झालेल्या 11 गावातील विविध कामाच्या नियोजनासंदर्भात सुरू झालेल्या दोन दिवशीय प्रशिक्षण वर्गात ते बोलत होते.
दोन दिवस समितीला प्रशिक्षण
जलयुक्त शिवार अंतर्गत चौथ्या टप्प्यांमध्ये यावल तालुक्यातील अकरा गावांचा समावेश करण्यात आला. या गावातील प्रत्येकी पाच जणांची एक समिती तयार करण्यात आली असून या सर्व 55 जणांना बुधवारी व गुरूवारी असे दोन दिवस नियोजन संदर्भात प्रशिक्षण दिले जात आहे. बुधवारी या प्रशिक्षण वर्गाला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सुरवात झाली. या कार्यक्रमाची प्रस्तावना तालुका कृषी अधिकारी आर.डी.वानखेडे यांनी केली. कार्यक्रमात माजी आमदार शिरीष चौधरी, प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, निवासी नायब तहसीलदार वैभव पवार, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.पी.चौधरी, प्रा.व्ही.आर.पाटील, पंचायत समितीचे सदस्य योगेश भंगाळे, अतुल चौधरी, अजित पाटील, अतुल चौधरी व जलसंधारण नियोजन तज्ज्ञ सागर धनाड यांची उपस्थिती होती.
चौथ्या टप्प्यात अकरा गावांचा समावेश
जलयुक्त च्या चौथ्या टप्प्यात तालुक्यातील सातोद, कोळवद, परसाडे, सांगवी बुद्रुक, बोरखेडा खुर्द, न्हावी, चुंचाळे, नायगाव, कासारखेडा, चिंचोली व हंबर्डी या 11 गावांचा समावेश करण्यात आला आहे.