माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांची ग्वाही ; संत मुक्ताई शुगर अॅण्ड एनर्जी लि. कारखान्याचा पाचव्या गळीत हंगामाचा शुभारंभ
मुक्ताईनगर- शेतकर्याची प्रगती व्हावी तसेच शेतकर्यांना न्याय देण्यासाठी कारखाना सुरू करण्यात आला असून कारखान्याचा फायदा झाला तर शेतकर्याचा फायदा आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेतकर्यांनी ऊस लागवड करावी तसेच शासनाने ठरवून दिलेल्या भावापेक्षा 20 रुपये जास्त म्हणजे एक हजार 800 रुपये प्रति मेट्रीक टन भाव उसासाठी देण्यात येणार असल्याची ग्वाही माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे दिली. संत मुक्ताई शुगर अॅण्ड एनर्जी लि.घोडसगाव, ता.मुक्ताईनगरच्या पाचवा गळीत हंगाम 2018-19 च्या शुभारंभप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रसंगी सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे म्हणाले की, नाथाभाऊंनी फायदा किंवा नुकसानीचा विचार न करता केवळ शेतकर्यांना फायदा व्हावा म्हणूनच हा कारखाना सुरू केल्याचे सांगितले.
रावेर लोकसभा क्षेत्रात पर्यटनविकास करणार -मंत्री अर्चना चिटणीस
शेतकर्यांना चांगल्या दर्जाचे उत्पादन घेण्यासाठी पाणी महत्वाचे आहेत मात्र जमिनीत पाण्याची पातळी दिवसेगणिक कमी हात असल्याने जलपातळी वाढण्यासाठी शेतात पाणी अडवून पाणी जिरवणे गरजेचे असल्याचे मत मध्यप्रदेशाच्या महिला व बालकल्याण मंत्री अर्चना चिटणीस म्हणाल्या. साखर कारखान्याचा जोडीला इथेनॉलचा उद्योग सुरू करण्याची त्यांनी सूचना केली. मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या इच्छादेवी मंदिर परीसरात पर्यटन विकास करण्यासाठी मदत करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. रावेर लोकसभा क्षेत्रातील पर्यटन विकास तसेच मनरेगा कामांची लवकरच वर्कऑर्डर करून कामे करण्यात येणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
गव्हाणीत मोळी टाकून हंगामाचा शुभारंभ
मुक्ताईनगर परीरसरातील शेतकर्यांचे स्वप्न असणार्या परीसरातील औद्योगिक विकासाला चालना देणार्या संत मुक्ताई शुगर अॅण्ड एनर्जी लि.कारखान्याचा पाचव्या गळीत हंगामाचा शुभारंभ 29 ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत गव्हाणीत उसाची मोळी टाकून करण्यात आला.
या मान्यवरांची कार्यक्रमास उपस्थिती
अध्यक्षस्थानी माजी महसूलमंत्री आमदार एकनाथराव खडसे होते. पर्यटन व रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल, सामाजिक न्याय व राज्यमंत्री दिलीप कांबळे, मध्यप्रदेशच्या महिला व बालकल्याण मंत्री अर्चना चिटणीस, महानंदच्या अध्यक्षा मंदा खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार हरीभाऊ जावळे, आमदार संजय सावकारे, बुलडाणा जिल्हा परीषदेचे अध्यक्षा उमा तायडे, अल्पसंख्यांक आयोगाचे माजी अध्यक्ष मोहम्मद हुसैन खान, कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव जाधव, डॉ.प्रांजल खेवलकर, जिल्हा परीषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, नगराध्यक्षानजमा इरफान तडवी, अनिता येवले, भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे, महानंदा होले, पंचायत समिती सभापती शुभांगी भोलाने, गणेश पाटील, माधुरी नेमाडे, जिल्हा परीषद सदस्य कैलास सरोदे, भानुदास गुरचळ, रंजना पाटील, वर्षा पाटील, वनिता गवळे, जयपाल बोदडे, निलेश पाटील, वैशाली तायडे, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख, स्वीय सहाय्यक योगेश कोलते, नारायण चौधरी, पांडुरंग नाफडे, भोसले, गोपाल पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, कारखान्यास ऊस पुरवठणार्या पहिल्याच पाच शेतकर्यांसह अधिक ऊस उत्पादन घेणार्या शेतकर्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक विलास धायडे यांनी तर आभार निवृत्ती पाटील यांनी मानले.