शास्तीकर माफीची विरोधकांकडून ‘काऊंट डाऊन’ फलकबाजी

0
‘गाजररूपी’ आश्‍वासनांच्या निषेधार्थ सर्व विरोधक एकवटले
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील शास्तीकर 15 दिवसांत माफ करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच चिंचवड येथील जाहिर कार्यक्रमात केली. गेल्या तीन वर्षापासून मुख्यमंत्र्यांनी असे खोटे आश्‍वासन दिले आहे. त्यांच्या या ‘गाजररूपी’ आश्‍वासनांच्या निषेधार्थ सर्व विरोधक एकवटले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे तसेच विविध सामाजिक संस्थांच्यावतीने महापालिका भवनाबाहेर अनोखे आंदोलन सुरू करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी शहरवासियांना दिलेल्या त्यांच्याच आश्‍वासनाचे स्मरण देण्यासाठी ‘काऊंट डाऊन’ फलक लावून घोषणा देण्यात आल्या.
सर्वपक्षीय पदाधिकारी एकत्र…
यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष नगरसेवक नवनाथ जगताप, राष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटे, मयुर कलाटे, सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, शिवसेना मोहननगचे विभागप्रमुख विशाल यादव तसेच मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापालिकेकडून नागरिकांना जप्तीच्या नोटीसा…
मुख्यमंत्र्यांनी शास्तीकर माफीचे आश्‍वासन दिले, असतानाही महापालिकेकडून नागरिकांना जप्तीपूर्वीच्या नोटीसा दिल्या जात आहेत. त्यामुळे महापालिकेने त्वरित नागरिकांना जप्तीच्या नोटीसा देणे थांबवावे, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी चिंचवड येथील एका सभेत शास्तीबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार त्या-त्या महापालिकांना देण्यात येईल, असेही पाठीमागे एका सभेत जाहीर सांगितले होते. मात्र, त्यावर अद्याप काहीही झाले नाही. आता पुन्हा मुख्यमंत्र्यांनी शास्तीकराबाबत 15 दिवसात निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले आहे. त्याचे काऊंटडाऊन विरोधकांनी सुरू केले आहे.
——