’काऊंट डाऊन’चा फलक गायब केल्याच्या निषेधार्थ विरोधकांची आज निषेध सभा
राष्ट्रवादी कॉग्रेस, कॉग्रेस, शिवसेना, मनसे तसेच सामाजिक संस्थांची टीका
पिंपरी-चिंचवड : शास्तीची धास्ती 15 दिवसात घालवू या..! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वसानाचे ‘काऊंट डाऊन’ करण्यासाठी विरोधक, सामाजिक संघटनांनी महापालिका भवनासमोर लावलेला फलक सोमवारी गायब झाला आहे. सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाने फलक गायब केल्याचा आरोप करत विरोधक त्याचा निषेध करण्यासाठी मंगळवारी महापालिका मुख्यालयाच्या आऊट गेटच्या समोर 4 वाजता निषेध सभा घेणार आहेत. सत्ताधारी भाजपा व प्रशासन यांनी मिळून फलक काढून मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन हे मोठे गाजर होते, हेच या कृतीवरुन सिध्द केले आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
म्हणून लावला होता फलक
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शहरातील शास्तीकर 15 दिवसात माफ करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 9 जानेवारी 2019 रोजी चिंचवड येथील जाहीर कार्यक्रमात केली होती. त्यांच्या या गाजरुपी आश्वासनाच्या निषेर्धांत राष्ट्रवादी कॉग्रेस, कॉग्रेस, शिवसेना, मनसे तसेच सामाजिक संस्थाच्या वतीने एकत्रित येऊन महापालिका भवना समोर अनोखे आंदोलन करण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांनी शहरवासियांना दिलेल्या त्यांच्यांच आश्वासनाचे स्मरण करुन देण्यासाठी विरोधकांनी ‘काऊंट डाऊन’चा फलक लावला होता. त्याची मुदत 24 जानेवारी सपुंष्टात येणार होती. मात्र, सत्ताधारी भाजपच्या पदाधिकार्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना हाताशी धरुन हा फलक आजच काढून रडीचा डाव खेळला आहे. सत्ताधारी भाजपा आणि प्रशासन यांनी मिळून मुख्यमंत्री यांनी दिलेले आश्वासन हे मोठे गाजर होते. हेच या कृतीवरुन सिध्द केले आहे.
निषेधासाठी येण्याचे आवाहन
त्यामुळे या सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाचा निषेध करण्यासाठी महापालिका मुख्यालयाच्या आऊट गेटच्या समोर उद्या (मंगळवारी) दुपारी चार वाजता सर्वपक्षीय व सामाजिक संघटनेच्या वतीने निषेध सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. शहरातील सर्व राजकीय, सामाजिक कार्यकर्ते नेते व शास्तीकर बाधित नागरीकांनी सभेला उपस्थित रहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.