शास्त्रीय संगितातील स्वरांजली महोत्सव जानेवारीत!

0

हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील ख्यातनाम कलाकार होणार सहभागी

मुंबई : बहुप्रतिक्षित वार्षिक भारतीय शास्त्रीय संगीत महोत्सव स्वरांजलीचे आयोजन मुंबईत वरळी येथील नेहरू सेंटरमध्ये 3 ते 5 जानेवारी 2019 दरम्यान करण्यात येणार आहे. नावावरून ध्वनित होते त्यानुसार स्वरांजली ही श्रद्धांजली आणि स्वरांचा उत्सव आहे. या महोत्सवाला 2002मध्ये सुरुवात झाली ती पंडित दिवंगत सुरेश हळदणकर, पंडित दिवंगत जितेंद्र अभिषेकी आणि दिवंगत पंडित पद्मभूषण सी.आर. व्यास या स्वरतपस्वींना आदरांजली अर्पण करण्याच्या उद्दिष्टाने. या तीन गुरूंनी पंडित प्रभाकर कारेकरांच्या शास्त्रीय संगीत प्रवासात महत्वपूर्ण मार्गदर्शन केले आणि ज्ञानात भर घातली. तिन्ही दिवशी सायंकाळी 6.30 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल. यंदा स्वरांजलीमध्ये शास्त्रीय संगीत क्षेत्रातील ख्यातकीर्त असे कलाकार सहभागी होत आहेत. त्यांत प्रख्यात संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा, गायिका बेगम परवीन सुलताना, घटम विद्वान टी. एच. विक्कू विनायक्रम, तालवादक व्ही. सेल्वागणेश, तंतूवाद्य व र्फ्क्युनिस्ट कलाकार तौफिक कुरेशी, पंडित वेंकटेश कुमार, गायिका देवकी पंडित आणि आरती अंकलीकर यांचा समावेश आहे.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे गुरुवारी, 3 जानेवारी 2019 रोजी स्वरांजलीची सुरुवात ज्येष्ठ गायक व मधुर, भक्कम तसेच दुमदुमणारा आवाज ज्यांना लाभला आहे अशा पंडित वेंकटेश कुमार यांच्या गायनाने होणार आहे. ते ग्वाल्हेर आणि किराणा घराण्याचा वारसा सांगतात. पहिल्या दिवसाची सांगता पटियाला घराण्याच्या व श्रीमंत आवाज लाभलेल्या पद्मभूषण आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेत्या बेगम परवीन सुलताना यांच्या गायनाने होणार आहे.

3 जानेवारीपासून नेहरु सेंटर येथे महोत्सवाला सुरुवात

दुसर्‍या दिवशी म्हणजे शुक्रवारी, 4 जानेवारी 2019 रोजी लोकप्रिय गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या गायनाने महोत्सवाची सुरुवात होणार आहे. दुसर्‍या दिवसाची सांगता संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांच्या वादनाने होणार आहे. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 5 जानेवारी 2019 रोजी महोत्सवाला देवकी पंडित यांच्या गायनाने सुरुवात होईल. महोत्सवाची सांगता शास्त्रीय फ्यूजन संगीताने होईल. त्यांत घटमवादक टी एच विक्कू विनायक्रम, तालवादक व्ही. सेल्वागणेश, तंतुवाद्यकार व र्फ्क्युनिस्ट तौफीक कुरेशी आणि तबलावादक आदित्य कल्याणपुर यांचा समावेश असेल.

स्वरांजली 2019 हा भारतीय शास्त्रीय संगीत महोत्सव स्वरप्रभा ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात येतो. महिंद्रा फायनान्स, आदित्य बिर्ला कॅपिटल, अल्ट्राटेक सिमेंट, कोटक म्युच्युअल फंड या कंपन्यांनी तो प्रायोजित केला आहे. स्वरप्रभा चॅरीटेबल ट्रस्टची स्थापना प्रख्यात शास्त्रीय संगीत कलाकार पंडित प्रभाकर कारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. ते या संस्थेचे अध्यक्ष आणि प्रेरणास्त्रोतही आहेत. संगीत आणि त्यातही शास्त्रीय संगीताचा प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी संस्थेने स्वतःला वाहून घेतले आहे. संस्था युवा कलाकारांना व्यासपीठ मिळवून देते. या महोत्सवाच्या प्रवेशिका www.bookmyshow.com वर उपलब्ध असून 26 डिसेंबर 2018 पासून वरळी येथील नेहरू सेंटर सभागृह येथेही उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी 24964680 या क्रमांकावर संपर्क साधावा.