‘शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांवरील जीएसटी रद्द करा’

0

पुणे । शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांच्या तिकिटांवर जीएसटी 28 टक्के व कलाकारांच्या मानधनावर 18 टक्के जीएसटी लागू झाला आहे. तो रद्द करण्यासाठी भारतातील सर्व शास्त्रीय कलाकारांचे प्रतिनिधित्व करणारे पत्र केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना देण्यात आले. ’सा’ व ’नी’ संस्थेचे सुरेंद्र मोहिते यांनी पुढाकार घेऊन हे पत्र तयार केले आहे. त्यावर पं. जसराज, पं. शिवकुमार शर्मा, पं. हरिप्रसाद चौरसिया, उस्ताद जाकीर हुसेन, डॉ. एन. राजम, डॉ. प्रभा अत्रे, तालयोगी पंडित सुरेश तळवलकर, पं.उल्हास कशाळकर, पं. राजन व पं. साजन मिश्रा व पं. विजय घाटे यांनी सह्या केल्या आहेत. हे पत्र, सुरेंद्र मोहिते व त्यांच्या सोबत पं. तळवलकर, पं. कशाळकर यांनी जेटली यांना दिले.

श्रोत्यांना शास्त्रीय संगीताच्या तिकिटावर 28 टक्के कर भरावा लागतो. हा कर खूप जास्त असून, मध्यमवर्गीयांना या पुढे कार्यक्रमांना जाणे अवघड होणार आहे. कलाकारांच्या मानधनावर 18 टक्के जीएसटी लागल्याने, संयोजकांना कलाकारांचे मानधन परवडत नाही. यामुळे छोट्या शहरांमध्ये सध्या कार्यक्रमच होत नाहीत, असे या पत्रातून अर्थमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. हजारो वर्षांपासून जतन केलेले हे शास्त्रीय संगीत कार्यक्रम न झाल्याने काही दिवसात नामशेष होतील, याची जाणिव ही करून दिली आहे. या पत्राची दखल न घेतल्यास, सर्व कलाकार पुढच्या महिन्यात पंतप्रधान मोदी यांना भेटायला घेऊन जाणार, असेही मोहिते यांनी सांगितले.